नाशिक : पोलिस भरतीचे संकेतस्थळ संथ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्र पोलिस दलाच्या पंधरा हजार जागांसाठी राज्यभरातील इच्छुकांनी ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पोलिसांच्या संकेतस्थळावर ‘ट्रॅफिक’ वाढल्याने संकेतस्थळ संथ झाल्याच्या तक्रारी येत आहेत. अर्ज नोंदणीनंतर शुल्क भरण्यात अडथळे येत असल्याच्या तक्रारी सर्वाधिक आहेत.

राज्य पोलिस दलात 2019 पासून भरती प्रक्रिया झालेली नाही. राज्यातील काही पोलिस आयुक्तालये व अधीक्षक कार्यालयांमध्ये रिक्त पदे भरण्यात आली होती. दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव आल्याने पोलिस भरतीची तयारी करणार्‍या उमेदवारांमध्ये नाराजी होती. दरम्यान, बेरोजगारीमुळे बारावी उत्तीर्णासह उच्चशिक्षितांनी या भरतीवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यात नाशिक ग्रामीण दलात 164 पोलिस शिपाई आणि 15 चालकांची पदे आहेत. तर, राज्यात 15 हजारांपर्यंत रिक्त जागा आहेत. नोकरभरतीची सुवर्णसंधी असल्याने राज्यातील लाखो उमेदवार नियमित अर्ज नोंदणीसाठी संकेतस्थळास भेट देत आहेत. अर्ज भरण्यासाठी अर्जदारांची संख्या वाढल्याने संकेतस्थळावर ताण आल्याने संकेतस्थळ बंद पडत आहे किंवा संथगतीने सुरू असल्याने अर्जदारांना तासन्तास ताटकळत बसावे लागत आहे. 30 नोव्हेंबरपर्यंत अर्ज नोंदणीची मुदत असल्याने अखेरच्या दिवसांमध्येच संकेतस्थळावर अडचणी येत असल्याने उमेदवारांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे गृह विभागाने अर्ज नोंदणीसाठी मुदतवाढ देण्याची मागणी उमेदवार करीत आहेत.

अशा आहेत अडचणी…
www.policerecruitment2022.mahait.org या संकेतस्थळावर गेल्यानंतर ‘द सर्व्हिस इज अनअव्हेलेबल’ असा संदेश येत आहे. अर्ज नोंदणीनंतर शुल्क भरण्यात अडचणी येत आहेत. वारंवार ‘सर्व्हर डाउन’ होत आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : पोलिस भरतीचे संकेतस्थळ संथ appeared first on पुढारी.