नाशिक : पोलिस भरतीसाठी एकापेक्षा अधिक ठिकाणी उमेदवारांचे अर्ज

पोलिस भरती नाशिक,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

राज्य पोलिस दलातील रिक्त जागांवरील भरती प्रक्रिया राबवली जात असून सोमवारपासून (दि.२) मैदानी चाचणीस सुरुवात झाली आहे. दरम्यान, अनेक उमेदवारांनी अर्ज करताना एकापेक्षा अधिक पोलिस आयुक्तालय किंवा अधीक्षक कार्यालयात अर्ज केल्याने प्राधान्य क्रम ठरवून ते मैदानी चाचणीस जात असल्याचे पोलिसांनी निरीक्षण नोंदवले आहे. त्यामुळे मैदानी चाचणीस गैरहजर उमेदवारांची संख्या लक्षणीय दिसत आहे.

नाशिक ग्रामीण मधील चालक पदाच्या भरती प्रक्रियेत पहिल्या दोन दिवस चाळीस टक्के उमेदवार गैरहजर राहिले. तर, शिपाई पदाच्या चाचणीवेळी पहिल्या दिवशी किमान दोनशे उमेदवारांनी दांडी मारली. काही उमेदवारांनी नाशिकबाहेरही अर्ज केले असल्याने त्यांनी भरतीस प्राधान्य देत त्यानुसार संबंधित ठिकाणी मैदानी चाचणी दिल्याचे निरीक्षण पोलिसांनी नोंदवले आहे. दरम्यान, ग्रामीण पोलिस मुख्यालयाच्या मैदानातच पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी उमेदवारांच्या सोयासीठी फोटो व झेरॉक्सची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांच्या भरतीसाठी जिल्ह्यासह परजिल्ह्यातील उमेदवार येत असून, त्यांच्याकडील कागदपत्रे पडताळणीत अनेकदा अडचणी येत आहेत. त्वरित झेरॉक्स व फोटो उपलब्ध व्हावेत, म्हणून मैदानातच झेरॉक्स आणि फोटो काढण्याचे केंद्र सुरू आहे. यासह ज्या उमेदवारांना अडचणी येत आहेत. त्यांच्या शंकांचे निरसन थेट अधीक्षक शहाजी उमाप आणि अपर अधीक्षक माधुरी कांगणे करीत आहेत. त्यामुळे अपिलांची संख्या अगदी नगण्य असून, अपिलांसाठी स्वतंत्र कक्ष कार्यान्वित ठेवला आहे. दरम्यान, बुधवारी तेराशे उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी बोलवण्यात आले होते. त्यापैकी ८०६ उमेदवारांनी हजेरी लावल्याचे प्राथमिक माहितीनुसार समोर आले आहे. त्यामुळे अनेकांनी प्राधान्य क्रम ठरवत इच्छित ठिकाणी मैदानी चाचणी दिल्याचे समोर येत आहे.

मैदानावर उमेदवारांच्या सोयीसाठी ध्वनीक्षेपकावरून सूचना दिल्या जात आहेत. प्रवर्गनिहाय कागदपत्रे पडताळणी सुरु असून तेथेच सगंणक कक्षही उभारण्यात आला आहे. पोलिस अधीक्षकांकडून उमेदवारांच्या अडचणी सोडवण्यासाठी छोटेसे कार्यालय सुरु केले आहे. सर्व मैदानी चाचणींचे चित्रीकरण केले जात असून गुण नोंदवल्यावर संबंधित उमेदवारांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या जात आहे. गुणपत्रक फलकावर झळकावले जात आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : पोलिस भरतीसाठी एकापेक्षा अधिक ठिकाणी उमेदवारांचे अर्ज appeared first on पुढारी.