नाशिक पोलीस दलात खांदेपालट; १४ वरिष्ठ निरीक्षकांच्या बदल्या

पोलिस बदल्या,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

राज्य पोलिस दलातील २२५ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करत शु्क्रवारी (दि.९) खांदेपालट करण्यात आली आहे. त्यामध्ये वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सहाय्यक निरीक्षकांसहित उपनिरीक्षकांचा समावेश असून, नाशिक आयुक्तालयातील पाच, ग्रामीणच्या सहा आणि महाराष्ट्र पोलिस अकादमीतील तीन वरिष्ठ निरीक्षकांची बदली झाली आहे. तर, नाशिक आयुक्तालयाला नव्याने तीन, अकादमीत दोन आणि ग्रामीण पोलिस दलाला पाच निरीक्षक मिळणार आहेत.

नाशिक आयुक्तालयाअतंर्गत येणाऱ्या मुंबई नाका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुनील रोहकले, विशेष शाखेचे वरिष्ठ निरीक्षक कुमार चौधरी यांची महाराष्ट्र पोलिस अकादमीत बदली करण्यात आली आहे. ग्रामीणचे सुभाष अनमुलवार यांना परभणी, अशोक रत्नपारखी यांना बुलढाणा, दिलीपकुमार पारेकर यांना उस्मानाबाद, भाऊसाहेब पठारे यांना पुणे शहर, रंगराव सानप यांना अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती तर सुरेश सपकाळे यांना नाशिक शहर येथे नियुक्ती देण्यात आली आहे. ‘एमपीए’चे श्याम निकम व बापूसाहेब महाजन यांची ग्रामीण पोलीस दलात बदली करण्यात आली आहे.

गडचिरोलीचे बिपीन शेवाळे, नांदेडचे गजानन सैंदाणे, मुंबई शहरचे राजू सुर्वे यांची नाशिक ग्रामीण दलात वर्णी लागली आहे. आराधना पाटील व देवयानी पाटील यांची नाशिक अनुसूचित जात प्रमाणपत्र पडताळणी समितीत बदली झाली आहे. मुंबई शहर पोलीस दलातील अशोक उगले व बाबासाहेब दुकळे यांची नाशिक शहर पोलिस दलात नियुक्ती झाली आहे. दरम्यान, सहायक पोलिस निरीक्षकांच्या (एपीआय) बदल्यामंध्ये ७ नवीन अधिकारी नाशिक परिक्षेत्रासाठी नियुक्त झाले आहेत. मुंबई शहरातून नाशिक आयुक्तालयात धीरज गवारे, मिथुन परदेशी आणि हेमंत फड यांची बदली झाली आहे. तर नाशिक आयुक्तालयातील अभिजित सोनवणे यांची मुंबई शहर, संजय बेंडवाल व विवेकानंद रोकडे यांची नागपूर शहर, तर नाशिक ग्रामीणचे स्वप्निल राजपूत यांची मुंबई शहरात बदली झाली आहे.

तीन निरिक्षकांना बढती

पंचवटी पोलिस ठाण्याचे निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे, नाशिक गुन्हे-२ चे आनंदा वाघ आणि एमपीएचे किरण साळवी या तीन अधिकाऱ्यांना सहायक पोलिस आयुक्तपदी बढती मिळाली आहे. त्यांचे महसूल संवर्ग निश्चित झाले असले, तरी पदोन्नतीवरील नियुक्ती प्रतिक्षा कायम आहे. संबंधितांची सध्याच्या नियुक्तीच्या ठिकाणावरुन बदली झाल्याचे लवकरच त्यांच्याही बदलीचे आदेश निघण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

हेही वाचा :

The post नाशिक पोलीस दलात खांदेपालट; १४ वरिष्ठ निरीक्षकांच्या बदल्या appeared first on पुढारी.