नाशिक : प्रतिबंधित पानमसाला-सुगंधित तंबाखू जप्त, दोघे जेरबंद

crime,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला पानमसाला आणि सुगंधित तंबाखू विक्री, वाहतूक व साठवणूक करणाऱ्या दोघांना अमली पदार्थविरोधी विशेष पथकाने जेरबंद केले. वैभव दिलीप भडांगे (२४) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून छोटा टेम्पोसह ४ लाख १५ हजार ३३३ रुपये किमतीचा पानमसाला व सुगंधित तंबा‌खू जप्त करण्यात पथकाला यश आले आहे.

पोलिस आयुक्त अकुंश शिंदे यांच्या संकल्पनेतून अमली पदार्थविरोधी विशेष पथकाची निर्मिती करण्यात आली आहे. या पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे जत्रा हॉटेल ते नांदूर नाका रस्त्यावर सापळा रचून संशयित भडांगेला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने प्रतिबंधित पानमसाला व सुगंधित तंबाखू विक्रीसाठी अब्दुल रहमान उर्फ राहिल मेहमुद फारूकी (३४, रा. मोतीसुपर मार्केट, पेठरोड) यांच्याकडून विकत घेतल्याचे समोर आले, त्यालाही ताब्यात घेण्यात आले आहे.

दोन्ही संशयितांविरोधात अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, आडगाव पोलिस अधिक तपास करीत आहेत. या कारवाईत पोलिस उपआयुक्त प्रशांत बच्छाव, सहायक पोलिस आयुक्त वसंत मोरे, पोलिस निरीक्षक प्रवीण चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक हेमंत नागरे, हवालदार संजय ताजणे, देवकिसन गायकर, नितीन भालेराव, रवींद्र दिघे, अनिरुद्ध येवले, चंद्रकांत बागडे, अविनाश फुलपगारे आदी सहभागी झाले होते.

हेही वाचा : 

The post नाशिक : प्रतिबंधित पानमसाला-सुगंधित तंबाखू जप्त, दोघे जेरबंद appeared first on पुढारी.