नाशिक : प्रवासादरम्यान तब्बल 43 तोळे सोन्यावर डल्ला

सोने चोरीला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरात प्रवासादरम्यान नागरिकांकडील सोन्याचे दागिने चोरून नेण्याच्या घटना वाढल्या असून, चोरट्यांनी विशेषत: महिलांना लक्ष्य केले आहे. मे ते ऑगस्ट या चार महिन्यांदरम्यान चोरट्यांनी प्रवासादरम्यान चोर्‍या करत 18 लाख नऊ हजार रुपयांचा मुद्देमाल साफ केला आहे. त्यात 434 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दागिन्यांचा समावेश आहे. या प्रकरणी शहरात 14 गुन्हे दाखल झाले आहेत.

द्वारका ते ओझरदरम्यान बसने प्रवास करणार्‍या महिलेच्या गळ्यातील चार तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरट्याने लंपास केल्याची घटना बुधवारी (दि.10) घडली. शकुंतला प्रकाश ताजणे (59, रा. टाकळी रोड, द्वारका) या बुधवारी ओझरला जाण्यासाठी सायंकाळी 5.30 च्या सुमारास बसमध्ये जात होत्या. त्यावेळी गर्दीचा फायदा घेत चोरट्याने शकुंतला यांच्या गळ्यातील 98 हजार रुपयांचे दागिने चोरून नेले. या प्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकारे चोरटे महिलांना हेरून त्यांच्याकडील दागिने चोरून नेत असल्याचे प्रकार वारंवार घडत आहेत.

महिलांनी मोह टाळावा

विशेषत: वृद्ध महिलांना चोरट्यांनी लक्ष केले आहे. बस प्रवासासह रिक्षाने प्रवास करतानाही चोरटे नागरिकांकडील किमती ऐवज लंपास करीत आहे. या प्रकरणी पोलिसांनी काही संशयितांना अटक करून त्यांच्याकडून गुन्हे उघडकीस आणले होते. मात्र, तरीदेखील हे प्रकार न थांबल्याने प्रवाशांकडील किमती ऐवजाच्या सुरक्षिततेचा प्रश्न कायम आहे. महिलांनी प्रवासाला निघताना सोन्याचे दागिने घालण्याचा मोह टाळावा. अगदी हौस असेल तर नकली दागिने घालावे, असा सल्ला पोलिसांनी दिला.

पोलिस ठाणेनिहाय दाखल चोरीचे गुन्हे

सरकारवाडा 03

पंचवटी 02

मुंबई नाका 02

भद्रकाली 02

नाशिकरोड 01

म्हसरुळ 01

अंबड 01

उपनगर 01

हेही वाचा :

The post नाशिक : प्रवासादरम्यान तब्बल 43 तोळे सोन्यावर डल्ला appeared first on पुढारी.