नाशिक : प्राध्यापकाने गेट वे ऑफ इंडिया ते एलिफंटा अंतर 3.56 तासांत पूर्ण केले

नाशिक (मालेगाव मध्य) : पुढारी वृत्तसेवा
मुंबईतील जेडी स्पोर्ट्स फाउंडेशन, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्विमिंग व राष्ट्रीय स्विमिंग संस्था, ओपन वॉटर सी स्विमिंग कोचिंग सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने जलतरणपटूंसाठी समुद्री अभियान राबविण्यात आले.

स्वच्छ भारत, सागरी पोहणे प्रचार-प्रसार, बुडण्यापासून वाचवणे या हेतूसाठी हे अभियान आयोजित करण्यात आले होते. त्यात मालेगावातील क्रीडाप्रशिक्षक प्रा. नितीन खैरनार यांनी सहभाग घेत गेट वे ऑफ इंडिया ते एलिफंटा लेणी असा 16.20 किलोमीटर पोहण्याचा विक्रम आपल्या नावावर नोंदवला. त्यांनी अवघ्या 3 तास 56 मिनिटांत हे अंतर पूर्ण केले. असा विक्रम करणारे ते तालुक्यातील पहिले खेळाडू ठरले आहेत. या अभियानात गुजरात, मध्य प्रदेश, तमिळनाडू, महाराष्ट्र राज्यातील 48 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. स्विमिंगमध्ये ऑलिम्पिक पदक मिळविण्यासाठी तरुणांना प्रेरणा देण्यासाठी तसेच बुडणे प्रतिबंधक जनजागृती मोहिमेचा एक भाग म्हणून त्यांनी हा प्रयत्न केला. या स्पर्धेत मुंबईचे पोलिस महानिरीक्षक कृष्णप्रकाश यांनी देखील सहभाग घेऊन हे अंतर पुन्हा एकदा पार केले. प्रशिक्षक डॉ. जयप्रकाश दुबळे यांच्या मार्गदर्शनाखाली अभियान पूर्ण करण्यात आले. जलतरणात विक्रम प्रस्थापित करणारे कृष्णप्रकाश, मुख्य प्रशिक्षक डॉ. जयप्रकाश दुबळे, डॉ. संभाजी भोसले, आंतरराष्ट्रीय सागरी जलतरणपटू जयंत दुबळे, पेस स्विमर श्रावणी गरजे, सुशील दूरगकर यांनी या स्पर्धेसाठी परिश्रम घेतले. स्पर्धेला मुंबई पोर्ट ट्रस्टचे उपाध्यक्ष आदेश तितरमारे, मेहुल शाह, चंदन पाटेकर यांनी हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला.

सागरी साहसी अभियानाकरता दररोज पाच ते सात किलोमीटर स्विमिंगचा सराव गिरणा वॉटर पार्क व रोकडोबा बंधारा परिसरात केला. काही महिन्यांपूर्वी मुंबईचे पोलिस महानिरीक्षक कृष्णप्रकाश यांनी वयाच्या 52 व्या वर्षी व्यग्र कामकाजात राहून हे अभियान पूर्ण केले. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन मी हे साहस केले. गेल्या दोन दशकांपासून चाललेला योगाभ्यास आणि प्राणायामाची तयारी यामुळे हे यश मिळवणे सहज सोपे झाले.                – प्रा. नितीन खैरनार, क्रीडाप्रशिक्षक, मालेगाव.

हेही वाचा:

The post नाशिक : प्राध्यापकाने गेट वे ऑफ इंडिया ते एलिफंटा अंतर 3.56 तासांत पूर्ण केले appeared first on पुढारी.