नाशिक : फर्दापूर शिवारात शेडमध्ये बांधलेल्या बोकडावर बिबट्याचा हल्ला

बिबट्या www.pudhari.news

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील फर्दापूर शिवारात नारळीचा मळा येथे गोविंद भिवसेन उगले यांच्या घराबाहेर शेडमध्ये बांधलेल्या बोकडावर बिबट्याने हल्ला करुन बोकडाचा बळी घेतला. शनिवारी (दि.10) रात्री 9 च्या सुमारास ही घटना घडली आहे.

फर्दापूर शिवारातील नारळीचा मळा परिसरात गोविंद उगले कुटुंबीयांचे घर आहे. शनिवारी रात्री या घरातील सदस्य जेवण करुन बाहेर ओसरीत बसलेले असताना दबक्या पावलाने आलेल्या बिबट्याने थेट शेडमध्ये शिरून बोकडावर हल्ला चढवला. काही क्षण उगले कुटुंबीयांची तारांबळ उडाली. मात्र सर्वांनी आरडाओरड करुन बिबट्याला पळवून लावले. मात्र या हल्ल्यात बोकडाच्या गळ्याला तसेच पोटाजवळ गंभीर जखमा झाल्याने बोकडाचा मृत्यू झाला. घटनेनंतर बिबट्या अंधारात पसार झाला. दरम्यान, वनविभागाला माहिती दिल्यानंतर वनकर्मचार्‍यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. सोमवारी (दि.11) सायंकाळी पुन्हा बिबट्या शिकारीसाठी या वस्तीवर आला. मात्र परिसरातील नागरिकांनी आरडाओरड करत फटाके वाजविल्याने बिबट्याने धूम ठोकली. वनविभागाने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी गोविंद उगले, अण्णा पाटील रानडे, गोवर्धन रानडे, दौलत रानडे, यांच्यासह परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे.

मका शेतीत बिबट्याने मांडले ठाण
दरम्यान, या वस्तीच्या जवळपास मकाच्या शेतात बिबट्याने ठाण मांडलेले असल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. बोकडावर हल्ला केल्यानंतर बिबट्या मकाच्या शेतांमध्ये आश्रयास गेल्याचे त्यांचे म्हणणे आहे. परिणामी बिबट्याच्या भीतीने रात्रीअपरात्री घराबाहेर पडणे, शेतीला पाणी भरणे यासाठी शेतकरी धजावत नसल्याचे दिसत आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : फर्दापूर शिवारात शेडमध्ये बांधलेल्या बोकडावर बिबट्याचा हल्ला appeared first on पुढारी.