नाशिक : फावडे लेनमध्ये वाड्यास भीषण आग

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मेनरोड परिसरातील फावडे लेनमधील म्हसोबा मंदिराजवळील आंबेकरवाड्यास बुधवारी (दि.28) पहाटे आग लागली. शॉर्टसर्किटमुळे वाड्यास आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. सुदैवाने आगीची घटना लक्षात येताच आंबेकर कुटुंबीय वाड्याबाहेर आल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलाने सहा बंबांच्या मदतीने शर्थीचे प्रयत्न करून आगीवर सकाळी नियंत्रण मिळवले. या आगीत आंबेकर कुटुंबाचा पूर्ण संसार आणि वाडा जळून खाक झाला.

शहरातील मेनरोड परिसरात अनेक जुने वाडे असून, तेथे अरुंद गल्ल्या आहेत. रहिवासी परिसर व बाजारपेठ असल्याने या भागात नेहमी वर्दळ असते. या ठिकाणी आंबेकरवाडा असून, त्यात आंबेकर कुटुंबीयांची तिसरी पिढी राहत आहे. वाडामालक राजेंद्र आंबेकर, त्यांचा मुलगा अनिरुद्ध आंबेकर हे बुधवारी (दि.28) वाड्यात झोपलेले असताना पहाटे साडेतीन वाजता वाड्याच्या एका बाजूला आग लागली. धुराचा वास आल्याने अनिरुद्धने वडिलांना उठवले. दोघांनी पाहणी केली असता वाड्याच्या एका बाजूस आग लागल्याचे दिसले. त्यांनी गांभीर्य ओळखून पहिल्या मजल्यावरून खाली येत आरडाओरड करून रहिवाशांना हाक दिली. आगीची माहिती मिळताच स्थानिक नागरिक एकटवले व त्यांनी पाण्याचा मारा करून आग विझवण्याचा प्रयत्न केला व अग्निशमन दलालाही आगीची माहिती कळवली. वाड्याच्या उभारणीत लाकडाचा जास्त वापर झाल्याने काही क्षणात संपूर्ण वाडा आगीच्या भक्ष्यस्थानी गेला. आगीच्या ज्वाळा प्रचंड असल्याने वाड्यालगत उभ्या असलेल्या तीन वाहनांनीही पेट घेतला. नागरिकांनी ही वाहने त्वरित हटवल्याने पुढील अनर्थ टळला. मात्र आगीत वाहनांचेही नुकसान झाले.

हेही वाचा:

The post नाशिक : फावडे लेनमध्ये वाड्यास भीषण आग appeared first on पुढारी.