नाशिक : फेसबुकवर पोस्ट करणाऱ्यास मारहाण ; दोघांना अटक

सोशल मीडिया ,www.pudhari.news

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा

फेसबुक अकाउंटवर पोस्ट केल्यामुळे चांदवड तालुक्यातील सरपंचाला राग अनावर होऊन त्याने काही मित्रांसमवेत फिर्यादीला त्यांच्या दुकानात जात जबरदस्त मारहाण केली. मारहाणीचा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या मारहाण प्रकरणी फिर्यादी संजय भास्कर पगार (४३, खडकओझर) याने वडनेरभैरव पोलिसांत फिर्याद दिल्याने सरपंच सागर पगारसह त्यांचे १९ साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात दोघांना अटक करण्यात आली असून, ३ दिवसांची पोलिस कस्टडी सुनावण्यात आल्याची माहिती पोलिस अधिकारी मयूर भामरे यांनी दिली.

खडकओझर येथील फिर्यादी संजय पगार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या फेसबुक अकाउंटला एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमुळे सरपंच सागर पगार यांना राग आला. यामुळे त्यांनी फोन करून पोस्ट डिलिट करण्यास सांगत दम दिला. त्यानंतर सरपंच पगार यांनी गणेश पगार, संतोष पगार, नामदेव पगार, नवनाथ पगार, सुरेश पगार, अनिल पगार, दत्तू पगार, श्रीधर पगार, तुकाराम पगार, संतोष इंगळे, ज्ञानेश्वर पगार, निशांत पगार, सौरभ पगार, शिवनाथ पगार, चेतन पगार, रोहिदास पगार, गणेश सावकार, समाधान पगार, दीपक पगार आदींनी दुकानात येत मारहाण करीत दुकानाचे नुकसान केले. या घटनेत फिर्यादी संजय पगार हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर नाशिक येथे उपचार सुरू आहेत.

या घटनेबाबत फिर्यादी संजय पगार यांनी वडनेरभैरव पोलिसांत तक्रार दाखल केल्याने सरपंच सागर पगारसह १९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक मयूर भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस उपनिरीक्षक दौंडे करीत आहे.

हेही वाचा : 

The post नाशिक : फेसबुकवर पोस्ट करणाऱ्यास मारहाण ; दोघांना अटक appeared first on पुढारी.