नाशिक : फ्लॅट विक्रीच्या बहाण्याने सेवानिवृत्त नायब तहसिलदारास पंधरा लाखांचा गंडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

मोकळा भुखंड विकसीत करून आठ मजली इमारतीतील फ्लॅट विक्री करण्याच्या बहाण्याने तिघांनी मिळून सेवानिवृत्त नायब तहसिलदारास गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी महेंद्र आनंदराव पवार (६५, रा. बाणेर, पुणे) यांच्या फिर्यादीनुसार सरकारवाडा पोलिस ठाण्यात तिघांविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकेश राजदेव प्रसाद, राजदेव प्रसाद (दोघे रा. पिंपळगाव बसवंत, ता. निफाड) आणि गौरव अण्णासाहेब संत (रा. जय अंबेनगर, पंचवटी) अशी तिघा संशयितांची नावे आहेत. पवार यांच्या फिर्यादीनुसार, तिघांनी मिळून जानेवारी २०१५ ते जून २०२३ दरम्यान, सुमारे साडे पंधरा लाख रुपयांना गंडा घातला. पवार नाशिकहून सेवानिवृत्त झाल्यानंतर पुणे येथे स्थायिक झाले. पवार यांच्या मुलाचा मित्र लोकेश हाेता. त्यामुळे लोकेश हा पवार यांच्या घरी कायम यायचा. दरम्यान, लोकेशने त्यांना सांगितले की, आठ मजली इमारत बांधली असून त्यातील एक फ्लॅट तुम्ही विकत घ्या. त्यानुसार पवार यांनी संशयितांना साडेपंधरा लाख रुपये दिले. मात्र, पैसे घेतल्यानंतर संशयितांनी दस्तनोंदणीसाठी टाळाटाळ केली. २०२१ मध्ये लोकेशच्या घरी पवार गेल्यावर त्याने गौरव संत याला फ्लॅट विकल्याचे सांगितले. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर पवार यांनी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर पवार यांनी न्यायालयात अर्ज केल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार सरकारवाडा पोलिस ठाण्यात तिघांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

The post नाशिक : फ्लॅट विक्रीच्या बहाण्याने सेवानिवृत्त नायब तहसिलदारास पंधरा लाखांचा गंडा appeared first on पुढारी.