नाशिक : बंड रोखण्यासाठी ‘शिवसेना पदाधिकारी नगरसेवकांच्या दारी’

शिवसेना पदाधिकारी नगरसेवकांच्या दारी,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आगामी काळात आणि मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षात होणारे बंड रोखण्यासाठी शिवसेना पदाधिकारी सरसावले असून, त्याचाच एक भाग म्हणून पदाधिकार्‍यांनी पक्षातील नगरसेवकांच्या दारी जाऊन त्यांच्याशी हितगूज साधण्याची मोहीम हाती घेतली आहे. यामुळे या मोहिमेचा लाभ कितपत होतो, हे आगामी काळात पुढे येईलच.

शिवसेनेचे सिडको विभागातील माजी नगरसेवक तथा म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष प्रवीण ऊर्फ बंटी तिदमे यांनी मंगळवारी (दि.20) शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला. प्रवेश करतानाच तिदमे यांना शिंदे गटाने महानगरप्रमुखपद बहाल केले आहे. तिदमे यांच्यानंतर पक्षाला आणखी इतर कुणा माजी नगरसेवक वा पदाधिकारी तसेच शिवसैनिकांच्या माध्यमातून खिंडार पडू नये, यासाठी आता शिवसेना पदाधिकार्‍यांनी खबरदारी घेण्याच्या दृष्टीने उपाययोजना हाती घेतल्या आहेत. त्यानुसार शिवसेनेचे उपनेते सुनील बागूल तसेच जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, मनपातील शिवसेनेचे माजी गटनेते विलास शिंदे यांनी बुधवारपासून (दि.21) नगरसेवकांच्या भेटीगाठी घेण्याची मोहीम हाती घेतली आहे. नगरसेवकांच्या घरी जाऊन त्यांच्याशी हितगूज साधण्याबरोबरच महापालिका निवडणुकीतील आगामी रणनीती काय असेल आणि पक्षाकडून असलेल्या अपेक्षा यांची विचारपूस केली जात आहे. त्यानुसार पहिल्याच दिवशी पदाधिकार्‍यांनी पक्षाचे नगरसेवक प्रशांत दिवे यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी माजी महापौर अशोक दिवे उपस्थित होते. दिवे यांच्यानंतर पदाधिकार्‍यांनी माजी नगरसेविका मंगला आढाव तसेच रंजना बोराडे यांच्या निवासस्थानी भेट देत त्यांच्याशी संवाद साधत आगामी निवडणूक तसेच पक्षाच्या वाटचालीसंदर्भात संवाद साधला.

रणनीती आखण्याचे काम सुरू
शिंदे गट तसेच फडणवीस सरकारकडून शिवसेना पक्षातील कार्यकर्ते तसेच पदाधिकार्‍यांना गळाला लावण्याचे काम सुरू आहे. यामुळे त्यांच्या या रणनीतीला कार्यकर्ते तसेच माजी नगरसेवकांनी बळी पडू नये, या दृष्टीने ‘पदाधिकारी नगरसेवकांच्या दारी’ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. प्रवीण तिदमे यांच्या बंडानंतर त्याची लागण इतरत्र पसरू नये याची खबरदारी म्हणूनदेखील या मोहिमेकडे पाहिले जात आहे. त्यादृष्टीने शहरातील 34 नगरसेवकांच्या घरी जाऊन पदाधिकारी संवाद साधत आगामी रणनीती आखताना दिसत आहेत.

हेही वाचा :

The post नाशिक : बंड रोखण्यासाठी ‘शिवसेना पदाधिकारी नगरसेवकांच्या दारी’ appeared first on पुढारी.