नाशिक : बंदी झुगारून इगतपुरीत पर्यटक ‘झिम्माड’

भावली धरण,www.pudhari.news

इगतपुरी : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा
तालुक्यात सुरू असलेल्या झिम्माड पावसामुळे ठिकठिकाणी डोंगरउतारावरून पाण्याचे धबधबे झेपावू लागल्याने पर्यटकांची गर्दी वाढत आहे. तालुक्यात भावली डॅम, अशोका धबधबा, वैतरणा डॅम, भंडारदरा, दारणा, भाम धरण आदी निसर्गरम्य पर्यटनस्थळांवर पर्यटनासाठी मोठी गर्दी होत आहे. शनिवारी वनविभागाने पर्यटनस्थळी जाण्यास बंदी घातली. पोलिसांनी भावली धरणाकडे बंदोबस्त ठेवला. मात्र, पर्यटकांना येथे येण्यासाठी बंदी असूनही चोरी-छुप्या मार्गाने पर्यटक ‘वीकेंड’ला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हजेरी लावत आहेत.

गेले काही दिवस मनसोक्त बरसणार्‍या पावसाने घाट परिसरात सर्वत्र हिरवेगार गालिचे आणि धबधब्यांचे मनोहक रूप अनुभवायला मिळत आहे. पावसाळी पर्यटनस्थळाच्या शोधात असलेल्या निसर्गप्रेमींसाठी अशोका धबधबा हा उत्तम पर्याय असून मुंबई, ठाणे, कल्याण, वाशी, नवी मुंबई इथल्या पर्यटकांसोबतच नाशिक शहर आणि परिसर त्याचबरोबर स्थानिक इगतपुरी शहर आणि कसारा परिसरातील पर्यटकही या धबधब्यात मनसोक्त भिजण्याचा आनंद घेताना दिसत आहेत.

अप्पर वैतरणा धरण 26 किमी आहे. या ठिकाणी वीजनिर्मितीचा मोठा प्रकल्प आहे. या पावसाळी वातावरणाचा आनंद लुटण्यासाठी नाशिक, मुंबई, पुणे येथून मोठ्या प्रमाणात पर्यटक गर्दी करत असतात. भंडारदरा 35 किमी, दारणा धरण 30 किमी, खोडाळा 30 किमी, सुंदरनारायण गणेश मंदिर देवबांध 35 किमी, याशिवाय कुलंग, अलंग, मलंग, कळसूबाई, रतनगड या उत्तुंग डोंगररांगा तसेच सांधण दरी, रंधा धबधबा या ठिकाणपासून जवळच आहे. कसारा घाटाजवळ भातसा रिव्हर व्हॅली, उंट दरी, पाच धबधबे, असे सुंदर ठिकाणे आहेत. कसारा घाटातील धुके अनुभवणे तर एक रोमांचकारी अनुभव असतो. मात्र पर्यटनस्थळावर बंदी घातल्याने आलेल्या पर्यटकांनी इगतपुरी शहरातील रेल्वे तलाव व नगर परिषद तलावाकडे आपला मोर्चा वळवल्याचे पाहावयास मिळत आहे. पर्यटनबंदीमुळे अनेक पर्यटकांचा हिरमोड होताना पाहावयास मिळत आहे.

सुरक्षेच्या कारणावरून वनविभागाने पर्यटकांना पर्यटनस्थळी जाण्यास बंदी घातली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा ग्रामीण पोलिस विभागाकडून मोठा पोलिस बंदोबस्त पाठविला आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरील पिंप्रीसदो चौफुलीवर पोलिस बंदोबस्त तैनात आहे. छुप्या पद्धतीने भावली धरणाकडे जाणार्‍या पर्यटकांवर कारवाई करण्यात येत आहे.
– वसंत पथवे, पोलिस निरीक्षक, इगतपुरी

हेही वाचा :

The post नाशिक : बंदी झुगारून इगतपुरीत पर्यटक ‘झिम्माड’ appeared first on पुढारी.