Site icon

नाशिक : बदली प्रक्रियेत होणार दिव्यांगांच्या प्रमाणपत्राची छाननी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्हा परिषदेतील बहुचर्चित बदल्यांचे वेळापत्रक जिल्हा परिषद प्रशासनाने जाहीर केले आहे. त्यानुसार येत्या दि. 16 ते 19 मे दरम्यान कै. वाघ गुरुजी विद्यालय येथे विभागानुसार बदल्या होणार आहेत. या बदली प्रक्रियेमध्ये ज्यांना दिव्यांग प्रमाणपत्राचा आधार घेऊन सूट पाहिजे आहे, त्यांचे दिव्यांगाचे प्रमाणपत्र हे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी पडताळून घेणार आहेत. त्यामुळे यंदाच्या बदली प्रक्रियेत दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे लाभ घेणार्‍या बोगस कर्मचार्‍यांना चाप बसणार आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या बदल्यांचे रखडलेले वेळापत्रक अखेर सामान्य प्रशासन विभागाने जाहीर केले आहे. सामान्य प्रशासन विभागाने सीईओंकडे पाठविलेल्या फाइलला मंजुरी मिळाली असून, त्यानुसार दि. 16 ते 19 मेदरम्यान बदल्या होणार आहेत. कोरोना संकटामुळे गेल्या दोन वर्षांपासून कर्मचार्‍यांची बदली प्रक्रिया रखडली होती. आदिवासी व बिगर आदिवासीतील अनुशेषामुळे जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या बदल्या होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे मार्च आणि एप्रिल महिन्यांपासून शासनाकडून येणार्‍या योग्य त्या सूचना आणि आदेशांबाबत जिल्हा परिषद प्रशासन वाट बघत होते. मात्र, आदेश न आल्याने प्रशासनाने पूर्वीच्याच शासन आदेशाप्रमाणे बदली प्रक्रियेची तयारी केली. त्यानुसार सर्व विभागांकडून सेवाज्येष्ठतेची यादी मागविण्यात आली. त्यामुळे जि.प.तील बदल्यांबाबत वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते.

वेळापत्रक असे….
16 मे 2023 : सामान्य प्रशासन, अर्थ, कृषी
17 मे 2023 : ग्रामपंचायत विभाग, महिला बालकल्याण विभाग
18 मे 2023 : शिक्षण विभाग (शिक्षक संवर्ग वगळून), पशुसंवर्धन विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, बांधकाम विभाग एक, दोन, तीन,
19 मे 2023 : आरोग्य

हेही वाचा:

The post नाशिक : बदली प्रक्रियेत होणार दिव्यांगांच्या प्रमाणपत्राची छाननी appeared first on पुढारी.

Exit mobile version