नाशिक : बागलाणचे चौघे सुपर सुपर रेन्डोनियर

सुपर सुपर रेन्डोनियर www.pudhari.news

नाशिक (सटाणा) : पुढारी वृत्तसेवा
बागलाण सायकलिस्ट ग्रुपचे डॉ. किरण पवार, नितीन जाधव, मोहन सोनवणे व विनोद शिरसाळे यांनी 39 तासांत 600 किलोमीटरची राइड पूर्ण केली आहे. या कामगिरीमुळे त्यांना सायकलिंग क्षेत्रातील मानाचा समजला जाणार्‍या ‘सुपर सुपर रेन्डोनियर’ हा लक्षवेधी पुरस्कार मिळविला आहे.

फ्रान्समध्ये सर्वप्रथम 1920 मध्ये ही सायकलिंग क्षेत्रातील स्पर्धा सुरू झाली. ती 1970 नंतर सर्व जगभरात पोहोचली. भारतातही काही शहरांत या स्पर्धेचे आयोजन केले जाते. याच मालिकेत यावेळी ‘बागलाण सायकलिस्ट’तर्फे 600 किलोमीटर सायकल राइडचे आयोजन केले गेले. स्पर्धेत ठराविक मर्यादित वेळेत लांब अंतराच्या सायकलिंगचे लक्ष्य दिले जाते अन् ते अंतर पार करणे अनिवार्य असते. या स्पर्धेत 200, 300, 400 व 600 किलोमीटरच्या सायकल स्पर्धेचे उद्दिष्ट दिले जाते. 200 किलोमीटर स्पर्धेसाठी 13 तास 30 मिनिटे, 300 साठी 20 तास, 400 साठी 27 तास व 600 किलोमीटर स्पर्धेसाठी 40 तास इतकी वेळ मर्यादा असते. तसेच आयोजकांमार्फत जे कंटोल पॉइंट ठरवलेले असतात अशा कंटोल पॉइंटलाही वेळ मर्यादा ठरवलेली असते. याप्रमाणे स्पर्धा एका वर्षात पूर्ण केल्यास त्याला ‘सुपर रेन्डोनियर’ असे संबोधले जाते. नाशिक सायकलिस्टने 600 किलोमीटरच्या सायकल राइडचे आयोजन केले होते. स्पर्धेचा मार्ग नाशिक, निफाड, येवला, वैजापूर, गंगापूरमार्गे औरंगाबाद नंतर सोलापूर एक्सप्रेस हायवेवर बीडच्या पाडळसिंगी टोल नाक्याजवळ 300 किलोमीटर अंतर पूर्ण करुन पुन्हा त्याचमार्गाने नाशिक असा 600 किलोमीटर पूर्ण करण्याचे आव्हान होते. ते जिल्ह्यातून 21 सायकलिस्टस्ने स्वीकारले.सटाणामधून बीआरएम 600 किमी सायकलिंग राइडसाठी डॉ. पवार, जाधव, सोनवणे व शिरसाळे यांनी ही राइड 39 तासांतच पूर्ण करून मानाचा एसआर किताब मिळविला. बागलाण सायकलिस्ट ग्रुपने पहिले एसआर होण्याचा मान मिळविला.

हेही वाचा:

The post नाशिक : बागलाणचे चौघे सुपर सुपर रेन्डोनियर appeared first on पुढारी.