नाशिक : बारावी परीक्षेसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ

विद्यापीठ परीक्षा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता बारावीच्या फेब्रुवारी – मार्च 2023 मध्ये होणार्‍या लेखी परीक्षेला प्रविष्ट होण्यासाठी आवेदनपत्र भरण्याची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. ऑनलाइन पद्धतीने आवेदनपत्रे स्वीकारली जात असून, संकेतस्थळात उद्भवलेल्या तांत्रिक अडचणींमुळे नोंदणीला मुदतवाढ देण्याचा निर्णय शिक्षण मंडळाने घेतला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना येत्या 25 नोव्हेंबरपर्यंत आवेदनपत्र ऑनलाइन पद्धतीने भरता येणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी – मार्च 2023 च्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केल्यानंतर या परीक्षेला प्रविष्ट होऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांची परीक्षा आवेदनपत्रे कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत ऑनलाइन पद्धतीने भरण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली होती. आवेदनपत्र भरण्याच्या संकेतस्थळाचा काही तांत्रिक बिघाड झाल्याने सुमारे चार ते पाच दिवस बारावीचे आवेदनपत्र ऑनलाइन पद्धत ठप्प झाले होते. त्यामुळे नियमित शुल्कासह आवेदनपत्र दाखल करण्यासाठी मुदतवाढ देण्याचे शिक्षणमंडळाने जाहीर केले आहे. त्यानुसार व्यावसायिक अभ्यासक्रम शाखांचे, नियमित विद्यार्थी, सर्व शाखांचे पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेंतर्गत व तुरळक विषयक घेऊन प्रविष्ट होणार्‍या विद्यार्थ्यांना आवेदनपत्र दाखल करता येणार आहे. दरम्यान, नियमित शुल्कासह 25 नोव्हेंबरपर्यंत, तर विलंब शुल्कासह 26 ते 30 नोव्हेंबरदरम्यान ऑनलाइन आवेदनपत्र दाखल करता येतील. उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी चलन काढून शुल्क बँकेत भरण्याची मुदत 2 डिसेंबरपर्यंत असेल. त्यानंतर शैक्षणिक संस्थांना 7 डिसेंबरपर्यंत शुल्क भरण्याचा तपशील, विद्यार्थ्यांची यादी व अन्य आवश्यक माहिती विभागीय मंडळाकडे सादर बंधनकारक राहणार आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : बारावी परीक्षेसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ appeared first on पुढारी.