नाशिक : बिअर बार चालकाकडून लाच घेताना तिघांवर कारवाई

बार www.pudhari.news

नाशिक (निफाड) : पुढारी वृत्तसेवा

निफाड येथील बिअर बार मालकाकडून नऊ हजार रुपयांची लाच स्वीकारताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या फिरत्या पथकातील कर्मचारी व अन्य दोघांना लाचलुचपत विभागाच्या विभागाने रंगेहाथ अटक केली. हॉटेल व्यवसायात त्रुटी न काढण्यासाठी वार्षिक हप्ता म्हणून संबंधितांनी ही रक्कम मागितली होती.

तक्रारदार व्यक्तीचा बार आणि रेस्टॉरंटचा व्यवसाय असून, त्याचे तीन ठिकाणी दुकाने आहेत. या तीनही दुकानांमधून हॉटेल व्यवसाय कामांमध्ये त्रुटी न काढता व्यवसाय सुरळीत सुरू ठेवण्याच्या मोबदल्यात प्रत्येकी चार हजार रुपयेप्रमाणे 12 हजार रुपयांचा वार्षिक हप्ता म्हणून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या फिरत्या पथकातील कर्मचारी लोकेश संजय गायकवाड आणि निफाड येथील पंडित रामभाऊ शिंदे व प्रवीण साहेबराव ठोंबरे यांनी तक्रारदाराकडे लाच मागितलेली होती. तडजोडीअंती 9 हजार रुपये लाच घेण्याचे निश्चित झालेले होते. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली होती. त्यानंतर (दि. 6) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून संशयित ठोंबरे यास नऊ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ ताब्यात घेतले. ही कारवाई पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर पोलिस अधीक्षक एन. एस न्याहाळदे, पोलिस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संदीप साळुंखे, हवालदार पंकज पळशीकर, नाईक प्रभाकर गवळी, प्रफुल्ल माळी, नितीन कराड, चालक परशुराम गांगुर्डे यांच्या पथकाने कारवाई केली.

हेही वाचा:

The post नाशिक : बिअर बार चालकाकडून लाच घेताना तिघांवर कारवाई appeared first on पुढारी.