नाशिक : बिबट्याच्या कातडी विक्रीचा डाव उधळला, दोघे जेरबंद

बिबट्या कातडी विक्रीचा डाव उधळला,www.pudhari.news

नाशिक / इगतपुरी पुढारी वृत्तसेवा
अंबोली (ता. त्र्यंबकेश्वर) येथील बिबट्याची कातडी तसेच दुर्मीळ गिधाड अवयव तस्करी प्रकरण ताजे असतानाच गुरुवारी (दि.15) वनविभागाच्या पथकाने बिबट्याच्या कातडी विक्रीचा डाव उधळला. वनपथकाने नाशिक-पेठ महामार्गावर ननाशी वनपरिक्षेत्रातील आंबेगण फाट्यावर कारवाई करत दोन संशयित तस्करांच्या मुसक्या आवळल्या. वन्यजीवांच्या अवयव तस्करीचे नाशिक कनेक्शन पुन्हा एकदा समोर आले आहे.

पश्चिम नाशिक वनविभागाच्या इगतपुरी वनपथकाने 31 ऑगस्टला बिबट्याच्या कातडी तस्करी प्रकरणात चौघा संशयितांना जेरबंद केले होते. गोपनीय माहितीच्या आधारे इगतपुरी-नाशिक – ननाशी वनपरिक्षेत्राच्या पथकाने आंबेगण फाट्यावर बनावट ग्राहक तयार करून संयुक्त सापळा रचला. बिबट्याच्या कातडीची विक्री करण्यासाठी मोतीराम महादू खोसकर (35, रा. आडगाव देवळा, ता. त्र्यंबकेश्वर), सुभाष रामदास गुम्बाडे (35, रा. पाटे, ता. पेठ) या दोघांना रंगेहाथ ताब्यात घेतले.

संशयितांकडून बिबट्याची संपूर्ण कातडी जप्त करण्यात आली आहे. त्यांच्या म्होरक्याचा शोध वनविभागाकडून सुरू आहे. मुख्य वनसंरक्षक नितीन गुदगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपवनसंरक्षक पंकज गर्ग, सहायक वनसंरक्षक अनिल पवार यांच्या नेतृत्वाखाली वनपरिक्षेत्र आधिकारी केतन बिरारीस, वनपरिमंडळ आधिकारी भाऊसाहेब राव, पोपट डांगे, रुपेश दुसाने, वनरक्षक विठ्ठल गावंडे, गौरव गांगुर्डे, फैज अली सय्यद, मझहर शेख, गोरख बागूल, कैलास पोटिंदे, चिंतामण गाडर, शरद थोरात, राहुल घाटेसाव, उत्तम पाटील, विजय पाटील, प्रकाश साळुंखे, वाहनचालक नाना जगताप, मुज्जू शेख, सुनील खानझोडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास ननाशी वनपरिक्षेत्र आधिकारी सविता पाटील करीत आहेत.

11 लाखांचा सौदा
वनपथकातील कर्मचार्‍यांनी संशयित तस्करांसोबत बनावट ग्राहक म्हणून संवाद साधत 11 लाखांत सौदा ‘फिक्स’ केला. संशयित आंबेगण फाट्यावर एका शालीमध्ये गुंडाळून बिबट्याची कातडी घेऊन आले असता पथकाने त्यांना रंगेहाथ ताब्यात घेतले. तस्करीसाठी पाच महिन्यांच्या बिबट्याची शिकार करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज वरिष्ठ वनाधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : बिबट्याच्या कातडी विक्रीचा डाव उधळला, दोघे जेरबंद appeared first on पुढारी.