Site icon

नाशिक : बिबट्याच्या भीतीने त्र्यंबकमध्ये सामसूम; सायंकाळी पाचच्या आत रहिवासी घरात

नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा

शहराच्या वस्तीलगत बिबट्याचे दर्शन आणि त्याच्या हल्ल्यात चिमुकलीचा मृत्यू यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सकाळ-सायंकाळ नीलपर्वत परिसरात फेरफटका मारणाऱ्यांची संख्या रोडावली आहे. सायंकाळी 5 नंतर तर नवीन वसाहतींच्या घरांचे दरवाजे बंद होत असून सर्वत्र सामसुम होत आहे.

ब्रह्मगिरी पायथा येथे सकाळी व्यायामासाठी जाणाऱ्यांची संख्या आता रोडावली आहे. दररोज सकाळी 6 च्या सुमारास जवळपास 45 ते 50 नागरिक भातखळापर्यंत दीड किलोमीटर अंतर पायऱ्यांनी जात असतात. मागच्या काही वर्षांपासून या माॅर्निंग ग्रुप सदस्यांमध्ये वाढ होत आहे. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा सर्व ऋतूंमध्ये शारीरिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी ब्रह्मगिरीवर जाणाऱ्या ग्रुपमध्ये मागच्या काही दिवसांपासून अवघे आठच सदस्य फेरफटका मारताना दिसत आहेत. याबाबत बोलताना नितीन पवार यांनी, बिबट्याच्या दहशतीने आम्ही सकाळी थोडे उशिरा जाण्यास सुरुवात केल्याचे तसेच सोबत काठी बाळगत असल्याचे सांगितले.

पर्यटनावर परिणाम
बिबट्याच्या भीतीने यात्रेकरू भाविकांची संख्याही रोडावली आहे. सर्वत्र शुकशुकाट दिसून येत आहे. गंगाद्वार येथे रिक्षा तसेच वाहनांनी लग्नस्तंभापर्यंतप्रवासी जात आहेत. मात्र बिबट्याचा वावर वाढल्याच्या चर्चेने रिक्षाचालक दुपारी 3 नंतर भाविकांना घेऊन जाण्यास थेट नकार देत आहेत. याचा थेट परिणाम ब्रह्मगिरी, गंगाद्वार या परिसरातील यात्रा, पर्यटनावर झाला आहे. खाद्य पेयविक्रेते, प्रवासी वाहनचालक यांच्या व्यवसायावरही परिणाम झाला आहे.

वनखात्याने काही ठिकाणी पिंजरे लावले आहेत. परंतु शहरात अफवांचे पेव फुटले आहे. बिबट्या दिसल्याचे खरे-खोटे किस्से सांगणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. अफवांनी जनजीवन विस्कळीत झाले आहे. नीलपर्वत आणि परिसरातील वस्त्यांमध्ये कच्च्या घरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत रहिवासी अंगणात अथवा मोकळ्या जागेत हवेसाठी थांबत नाहीत, इतकी दहशत पसरलेली आहे.

वनविभागाने केले आवाहन
त्र्यंबकेश्वर वनविभागाने नीलपर्वत परिसरात पिंजरा लावला आहे. तसेच वनरक्षक गस्ती घालत आहेत. नागरिकांनी नाहक घाबरून जाऊ नये, बिबट्याचा संशय असल्यास धूर करावा. मिरच्यांचा ठसका करावा. तसेच टॉर्च आणि पिवळ्या लाइटचा वापर करावा, असे आवाहन वनविभागाने केले आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : बिबट्याच्या भीतीने त्र्यंबकमध्ये सामसूम; सायंकाळी पाचच्या आत रहिवासी घरात appeared first on पुढारी.

Exit mobile version