नाशिक : बिबट्याच्या हल्ल्यातील मृत बालकाच्या पालकांना वीस लाखांची मदत

आमदार दिलीप बनकर

पिंपळगाव बसवंत : (जि.नाशिक) पुढारी वृत्तसेवा

निफाड तालुक्यातील म्हाळसाकोरे येथे २९ जानेवारी २०२३ रोजी हिरामण सुरेश ठाकरे यांचा सहा वर्षांचा मुलगा रोहन आईबरोबर शेतातून जात असताना बिबट्याच्या हल्ल्यात जागीच ठार झाला होता. त्यानंतर आमदार दिलीप बनकर यांनी शासनाच्या वतीने देण्यात येणारी मदत तत्काळ उपलब्ध करून देण्यासाठी केलेल्या पाठपुराव्यामुळे वनविभागाच्या वतीने रोहनचे पालक हिरामण ठाकरे व निर्मला ठाकरे यांना 20 लाखांचा धनादेश अदा करण्यात आला.

शासकीय मदतीतील रकमेपैकी १० लाखांचा धनादेश अदा करून शासनाच्या २३ ऑगस्ट २०२२ च्या निर्णयानुसार उर्वरित रक्कम १० लाखांपैकी ५ लाख ५ वर्षांसाठी, तर उर्वरित ५ लाख १० वर्षांसाठी पालकांच्या संयुक्त खात्यात मुदत ठेव स्वरूपात ठेवण्यात येणार आहे. संबंधित रकमेचा धनादेश ठाकरे कुटुंबास आमदार दिलीप बनकर यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. त्यावेळी येवला (प्रा.) येथील वनपरिक्षेत्र अधिकारी अक्षय म्हेत्रे, म्हाळसाकोरे येथील शेतकरी दत्तू मुरकुटे व ठाकरे कुटुंब उपस्थित होते.

निफाड तालुक्यात मोलमजुरीसाठी आलेल्या ठाकरे कुटुंबातील मृत्यू झालेला मुलगा परत येणार नाही. पण शासनाने जाहीर केलेल्या अर्थसाहाय्य तत्काळ मिळावे, याकरता शासन स्तरावर पाठपुरावा करीत अर्थसाहाय्य तातडीने ठाकरे कुटुंबास मिळवून दिले. त्यामुळे ठाकरे कुटुंबाला भविष्याचा उदरनिर्वाह करणे सोयीस्कर होणार आहे.

-आमदार दिलीप बनकर

 

ठाकरे कुटुंबाच्या सांत्वनासाठी आलेल्या आमदार बनकर यांनी शासनाचे अर्थसाहाय्य लवकरात लवकर मिळवून दिल्याचा शब्द देत तातडीने पूर्ण केला. त्यामुळे संबंधित ठाकरे कुटुंब गहिवरले.

-दत्तू मुरकुटे, शेतकरी, म्हाळसाकोरे

हेही वाचा :

The post नाशिक : बिबट्याच्या हल्ल्यातील मृत बालकाच्या पालकांना वीस लाखांची मदत appeared first on पुढारी.