नाशिक : बिबट्यापाठोपाठ गिधाडाचे अवयव हस्तगत; इगतपुरी वनपथकाची चिंचुतारा जंगलात कारवाई

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

अंबोली (ता. त्र्यंबकेश्वर) येथील बिबट्याच्या कातडीची तस्करी प्रकरणात पश्चिम नाशिक वनविभागाच्या इगतपुरी वनपथकाने गेल्या आठवड्यात संशयित आरोपीचे गाव असलेल्या मोखाडा वनपरिक्षेत्रातील चिंचुताराच्या जंगलात खोदकाम करत गाडलेली बिबट्याची खोपडी, दात, जबड्यासह अन्य अवयव शोधून काढले होते. त्यापाठोपाठ रविवारी (दि.११) पुन्हा कुडवा (जि. पालघर) येथे एका संशयिताच्या घरातून दुर्मीळ गिधाडाचे अवयव हस्तगत करण्यात वनपथकाला यश आले.

 

बिबट्याच्या कातडी तस्करीचे कनेक्शन परजिल्ह्यात पोहोचले असून, मोखाडा परिसरातील संशयितांच्या आदिवासी पाड्यावर वनपथकाने लक्ष केंद्रित केले आहे. चौघा संशयितांच्या चौकशीतून समोर आलेल्या माहितीच्या आधारे वनपथकाने कुडवा येथे (जि. पालघर) एका संशयिताच्या घराची झाडाझडती घेतली असता त्यात नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या गिधाडाचे काही अवयव आढळून आले. या प्रकरणी वन्यजीव कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. संशयितांकडे इतरही वन्यजीवांचे अवयव असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

दरम्यान, वनपथकाला पहिल्या कारवाईत बिबट्याची खोपडी, दात, जबडा, चारही पायांची हाडे, पाठीच्या मणक्याची हाडे, माकडहाड, बरगडी, मांडीचे हाड, कंबरेचे हाड, शेपटीचा काही भाग आदी अवयवांची हाडे, तर दुसऱ्या कारवाईत गिधाडाचे अवयव मिळवून आले. जप्त केलेले अवयव व कातडी आणि बिबट्याची जमिनीत पुरलेले हाडे हे सोमवारी (दि.१२) पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार असल्याची माहिती इगतपुरी वनपरिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस यांनी दिली.

संशयितांची कोठडी आज संपणार

बिबट्याच्या कातडी तस्करी प्रकरणात संशयित प्रकाश लक्ष्मण राऊत (४३, रा. रांजणपाडा, ता. मोखाडा, जि. पालघर), परशुराम महादू चौधरी (३०, रा. चिंचुतारा, ता. मोखाडा, जि. पालघर), यशवंत हेमा मौळी (३८, रा. कुडवा, ता. मोखाडा, जि. पालघर), हेतू हेमा मौळी (३८, रा. कुडवा, ता. मोखाडा, जि. पालघर) यांच्या वनकोठडीची मुदत सोमवारी (दि.१२) संपणार आहे. त्यामुळे चौघा संशयितांना पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : बिबट्यापाठोपाठ गिधाडाचे अवयव हस्तगत; इगतपुरी वनपथकाची चिंचुतारा जंगलात कारवाई appeared first on पुढारी.