नाशिक : बियाणे उपसमितीच्या बैठकीत १४ नवीन वाणांना मान्यता

बियाणे www.pudhari.news

नाशिक (ओझर) : पुढारी वृत्तसेवा

कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या राज्य बियाणे उपसमितीच्या ५२ व्या विशेष बैठकीत राहुरी, दापोली, परभणी, अकोला, सोलापूर येथील कृषी विद्यापीठांच्या नवीन १४ अन्नधान्य व फळपीक वाणांच्या प्रस्तावांना मान्यता देण्यात आली. या वाणांची केंद्र सरकारच्या कृषी विभागाकडे शिफारस केल्याची माहिती राज्य बियाणे उपसमितीचे सदस्य खंडू बोडके-पाटील यांनी दिली.

बैठकीस राज्य कृषी आयुक्त धीरजकुमार, शेतकरी प्रतिनिधी खंडू बोडके-पाटील, चंद्रकांत शेवाळे यांच्यासह सर्व विद्यापीठांचे कुलगुरू व प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत दहा अन्नधान्ये व चार फळपिकांच्या नवीन वाणांबाबत सविस्तर चर्चा करून त्याबाबत केंद्र सरकारच्या कृषी विभागाकडे शिफारस करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यात रब्बी ज्वारी (ट्रॉम्बे अकोला सुरुची), भात (पीडीकेव्ही साधना), ज्वारी (फुले यशोमती), ऊस (फुले ११०८२), उडीद (फुले वसू), तीळ (फुले पूर्णा), ज्वारी (परभणी वसंत), सोयाबीन (एमएयूएस – ७२५), करडई (परभणी सुवर्णा-१५४), फळपिके पेरू (फुले अमृत), चिंच (फुले श्रावणी), डाळिंब (सोलापूर लाल), नारळ (कोकोनट हायब्रीड) या १४ वाणांच्या शिफारसीला मान्यता देण्यात आली आहे.

सोयाबीन बियाणांबाबत तक्रार : बैठकीत नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सोयाबीन व इतर बियाणांबाबत झालेल्या फसवणुकीच्या तक्रारींचा पाढाच खंडू बोडके-पाटील यांनी वाचला. तसेच सांगली येथील शिवतेज फार्मर प्रोड्यूसर कंपनीने निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांना सोयाबीनचे बोगस बियाणे विक्री केल्याने कारवाई करण्याची मागणी केली. जिल्ह्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा चाळ उभारणीसाठी मेट्रिक टनाप्रमाणे वाढीव अनुदान देण्याची मागणी मालेगावचे चंद्रकांत शेवाळे, निफाडचे खंडू बोडके-पाटील यांनी यावेळी केली. सोयाबीन, करडईसह इतर तेलपिकांचे उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कृषी विभागाने प्रयत्न करावे, अशी सूचनाही यावेळी करण्यात आली. बोडके पाटील व शेवाळे यांनी केलेल्या तक्रारींची दखल घेत सकारात्मक कार्यवाहीचे आदेश डवले यांनी दिले.

शेतकऱ्यांना संपर्काचे आवाहन : नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्यांना बनावट बियाणे दिल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याबाबत संबंधित कंपन्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश बियाणे उपसमितीच्या बैठकीत देण्यात आले आहेत. शेतकऱ्यांनी बियाण्यांबाबत फसवणूक झाल्यास आपल्या ७५८८०३६४३६ या क्रमांकावर संपर्क साधावा. त्यासाठी गांभीर्याने पाठपुरावा केला जाईल, असे आवाहन खंडू बोडके-पाटील यांनी शेतकऱ्यांना केले आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : बियाणे उपसमितीच्या बैठकीत १४ नवीन वाणांना मान्यता appeared first on पुढारी.