नाशिक : बीआरएम सायकल स्पर्धेत सिन्नरचे 31 स्पर्धक सहभागी

cycle www.pudhari.news

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
नाशिकमध्ये बीआरएम 200 किमी सायकल स्पर्धेचे रविवारी (दि. 6) आयोजन करण्यात आले होते. नाशिकमधून 88 जणांनी सहभाग नोंदविला. त्यापैकी 31 स्पर्धक हे सिन्नरचे होते. यात 4 महिलांचाही सहभाग होता. सर्वांनी यशस्वीरीत्या वेळेआधी स्पर्धा पूर्ण केली.

बीआरएम ही फ्रान्समध्ये 1920 साली सुरू झालेली सायकलिंग क्षेत्रातील ही स्पर्धा 1970 नंतर सर्व जगभर पसरली. भारतातही बर्‍याच शहरांत या स्पर्धेचे आयोजन केले जाते. या स्पर्धेत लांब पल्ल्याच्या सायकलिंगचे लक्ष्य दिले जाते आणि ठराविक वेळमर्यादा ठेवून ते अंतर पार पाडणे अनिवार्य असते. यात 200, 300, 400, 600 किमीच्या सायकलिंगच्या स्पर्धांचे आयोजन केले जाते. 200 किमीला वेळ मर्यादा 13 तास 30 मिनिटे असते. याशिवाय 3 चेक पॉइंटस् असतात. त्या त्या पॉइंट्सलाही काही वेळ मर्यादा आखून दिलेली असते. त्यावेळेत तिथे पोहोचणे आवश्यक असते. साधारणपणे दर 50 किमीवर एक चेक पॉइंट असतो. असेच बाकीच्या किमीसाठी पण वेगवेगळ्या वेळमर्यादा असतात. कोणत्याही एका स्पर्धेत भाग घेणार्‍याला रॅन्डोनियर असे संबोधले जाते. तसेच चारही स्पर्धा सायकलिस्टने एका वर्षात पूर्ण केल्या तर त्याला सुपर रॅन्डोनियर (एसआर) असे संबोधले जाते.

नाशिक सायकलिस्टने रविवारी 200 किमी सायकल स्पर्धेचे आयोजन केले होते. नाशिकपासून सुरू झालेली स्पर्धा निफाड, येवला सुरेगाव रस्ता व परत त्याचमार्गे नाशिक असा मार्ग होता. सिन्नरमधून बीआरएम 200 किमी या सायकल चॅलेंजसाठी सिन्नर सायकलिस्टचे अध्यक्ष नितिन जाधव, डॉ. संदीप मोरे, मुकेश चव्हाणके, रामभाऊ लोणारे, शिवाजी लोंढे, संदीप ठोक, योगेश शिंदे, मंगेश क्षत्रिय, जयेश नाईक, प्रशांत भावसार, संतोष मुटकुले, अनिल कवडे, ज्ञानेश्वर घेगडमल, अमोल चव्हाणके, संकेत लोणारे, भास्कर गोजरे, विलास तांबे, डॉ. भानुदास आरोटे, डॉ. दिलीप गुरुळे, डॉ. सोपान दिघे, डॉ. योगेश कर्पे, सूरज देशमुख, मनोज गुंजाळ, कांचेश पवार, गजानन जगताप, गणेश तांबोळी, संतोष कदम तर महिलांमधून डॉ. ज्योती मोरे, डॉ. योगिता कांडेकर, ज्योती कोकाटे, रजनी वाजे यांनी भाग घेतला. सर्वांनी यशस्वीरीत्या वेळेआधी स्पर्धा पूर्ण केली. नाशिकमधून 88 जणांनी सहभाग नोंदविला. त्यापैकी 31 स्पर्धक हे सिन्नरचे होते. सिन्नरमधून प्रथमच बीएमआर सायकल स्पर्धेसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात सायकलिस्ट सहभागी झाले होते. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी महेंद्र महाजन यांनी मार्गदर्शन व नियोजन केले. मार्शलिंगचे काम यशवंत मधोलकर, अनिलकुमार सुपे यांनी बघितले.

200 किमीमध्ये सिन्नरमधून सर्वधिक सायकलिस्टने सहभाग घेतला. यात महिलांनी नोंदविलेला सहभाग ही अभिमानाची बाब आहे. सिन्नर सायकलिंग नव्या उंचीवर जात आहे. अवघड आव्हान यशस्वीरीत्या पार केल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन. – नितीन जाधव, अध्यक्ष सिन्नर सायकलिस्ट

हेही वाचा:

The post नाशिक : बीआरएम सायकल स्पर्धेत सिन्नरचे 31 स्पर्धक सहभागी appeared first on पुढारी.