नाशिक : बेघरांसाठी मनपा उभारणार चार निवारा केंद्रे

नाशिक मनपा,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
केंद्रशासन पुरस्कृत दीनदयाल अंत्योदय योजनेतील राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत शहरी बेघरांना निवारा केंद्र उभारले जाते. या घटकानुसार निवारा हा महत्त्वाची गरज असल्याने शहरातील बेघर आणि निराश्रित व्यक्तींना या घटनांतर्गत निवारा उपलब्ध करून देण्यासाठी शहरात चार नवीन निवारा केंद्रांस मनपा महासभेने मंजुरी दिली. निवारा केंद्र उभारण्यासाठी 22 कोटी 63 लाख रुपयांचा सविस्तर प्रकल्प अहवाल शासनाकडे सादर करण्यात आला आहे.

निवारा केंद्र या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी शासनाने मनपा आयुक्तांची निवारा समन्वयक (नोडल) अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. फेब—ुवारी 2019 मध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार नाशिक मनपा हद्दीतही सर्वेक्षण करण्यात आले असून, शहरात एकूण 894 इतकी बेघरांची नोंद करण्यात आली आहे. त्यानुसार महापालिकेला 100 बेघर क्षमतेचे एकूण नऊ निवारा केंद्रे उभारायची आहेत. त्यानुसार नगर परिषद प्रशासन संचालनालयाच्या आदेशानुसार मनपाने नाशिक शिवारातील सर्व्हे नं. 288 साधुग्राम येथे 180 बेघर क्षमता असलेले कायमस्वरूपी नवीन निवारा केंद्राचे बांधकाम पूर्ण करून ते कार्यान्वित केले आहे. आता महापालिकेला चार जागांवर 581 बेघर लाभार्थी क्षमतेचे कायमस्वरूपी नवीन निवारा केंद्र उभारण्यासाठी बांधकाम विभागामार्फत बांधकामासाठीचा 19 कोटी 89 लाख 70 हजार आणि विद्युतविषयक कामाकरता दोन कोटी 73 लाख 32 हजार असा एकूण 22 कोटी 63 लाख तीन हजार रुपयांचा सविस्तर प्रकल्प अहवाल तांत्रिक मान्यतेसह महासभेच्या मान्यतेेने नगर परिषद प्रशासन संचालनालयाकडे सादर करण्यात आला आहे.

या ठिकाणी उभारणार निवारा केंद्रे
पंचवटीतील स.नं. 288 पैकी पब्लिक अ‍ॅमेनिटीच्या जागेत 46 क्षमतेचे निवारा केंद्र उभारण्यात येणार आहे. सातपूरमधील स.नं. 531, 532 व 533 पै. मधील सातपूर गावठामधील मनपाच्या जागेत 102 क्षमतेचे, वडाळा शिवारातील स.नं. 81 पै. मधील हौसिंग फॉर डीस हौसिंग या करता आरक्षित जागेत 213 बेघर क्षमतेचे आणि चेहडी शिवारातील स.नं. 25 पै. मधील ट्रक टर्मिनसकरता आरक्षित असलेल्या जागेत 220 बेघर क्षमतेचे असे एकूण 581 बेघर लाभार्थी क्षमतेचे निवारा केंद्र उभारण्यात येणार आहे.

सोलर सिस्टिम बसविणार
चारही निवारा केंद्रांच्या ठिकाणी मनपाकडून सोलर सिस्टिम बसविण्यात येणार असून, त्यासाठी 23 लाख 91 हजार 431 रुपये खर्च केले जाणार आहे. तसेच चारही केंद्रांच्या ठिकाणी दुर्घटना घडू नये याकरता अग्निशमन यंत्रणा उभारली जाणार असून, त्यासाठी 18 लाख 1 हजार 950 इतका खर्च मनपाने बनविलेल्या सविस्तर प्रकल्प अहवालात नमूद केला आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : बेघरांसाठी मनपा उभारणार चार निवारा केंद्रे appeared first on पुढारी.