नाशिक : बेमोसमी पावसाने कुठे गारांचा खच तर कुठे टोमॅटो भुईसपाट

पिंपळगाव मोर www.pudhari.news

नाशिक (पिंपळगाव मोर) : पुढारी वृत्तसेवा
इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव मोर तास जोरदार गारपीट होऊन सुमारे एक तास अवकाळी बरसला. रात्रीच्या सुमारास आलेल्या पावसामुळे शेतकर्‍यांची पुरती धांदळ उडाली. तालुक्याच्या पूर्व भागात रब्बी हंगामात टोमॅटो या बागायती पिकाचे सर्वात जास्त दरवर्षी उत्पादन घेतले जाते प्रामुख्याने दौंडत, उभाडे, धामणी, पिंपळगाव मोर, बेलगाव तर्‍हाळे, धामणगाव, साकूर, टाकेद, अधरवड, खेड आदी गावांतील परिसरात टोमॅटो पिकाची लागवड शेतकर्‍यांनी केली आहे. पावसामुळे जागोजागी टोमॅटो शेतीचे नुकसान झाले आहे.

बेमोसमी पावसामुळे शेतीवर बुरशीजन्य व करपा घुबडा आदी रोगांचा प्रादुर्भाव दिसतो आहे. एकीकडे नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या वाढत आहेत तोच शेतीलाही फटका बसतो. खरीप हंगामाची जमापुंजी पै-पै जमा करून शेतकर्‍यांनी रब्बीतील पीक कसेबसे उभे केले होते. गारपिटीने टोमॅटो फळांना तडे जाऊन फळगळ झाली आहे. कुठे तारी-बांबूसह पीक जमिनीवर लोळले आहे. यंदा टोमॅटो लागवडीवेळीही एक दोनदा झालेल्या रिमझिम सरींनी आणि वार्‍यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला होता. टोमॅटो लागवड, महागडे औषधे, खते यासाठी परिसरातील शेतकर्‍यांनी लाखो रुपये खर्च केलेले आहेत. मात्र वाढत्या थंडीमुळे पिकांवर होत असलेल्या प्रतिकूल परिणामांमुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाले असल्याचे चित्र आहे. भुईमूग, वांगे, मका, ज्वारी आदींसह वेलवर्गीय पीकांवरही बेमोसमीचा परिणाम जाणवत आहे.

काही दिवसांपासून अवकाळी पावसासह गारपीट होत असल्याने शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. प्रचंड मेहनत व काबाडकष्ट करून अपेक्षेप्रमाणे प्लॉट तयार केला होता. अवकाळी पावसामुळे नव्याने सुरुवात करावी लागणार असून भांडवल खर्च दुप्पट होणार आहे. – उत्तम काळे, शेतकरी.

हेही वाचा:

The post नाशिक : बेमोसमी पावसाने कुठे गारांचा खच तर कुठे टोमॅटो भुईसपाट appeared first on पुढारी.