नाशिक : बोरी अंबेदरी प्रकल्प पीडितांची नागपूरला निदर्शने

बोरी अंबेदरी www.pudhari.news

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा
सुमारे 50 दिवस धरणे देऊनही स्थानिक पातळीवर दुर्लक्षित ठरलेल्या बोरी अंबेदरी बंदिस्त कालवाविरोधी आंदोलकांनी अखेर थेट नागपूर हिवाळी अधिवेशन गाठत त्याठिकाणी निदर्शने करीत शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

बोरी अंबेदरी धरणातून शेती सिंचनासाठी बंदिस्त पाइपलाइन कालवा नेण्याचा प्रकल्प पालकमंत्री दादा भुसे यांच्या पाठपुराव्याने राबविला जात आहे. त्याला स्थानिक शेतकर्‍यांचा विरोध आहे. कालवा पाइपबंद झाल्यास पाणी तुटून शेतकरी उद्ध्वस्त होईल, त्यामुळे कालव्याची दुरुस्ती करावी आणि पाइप टाकण्याचा प्रकल्प गुंडाळावा, या मागणीसाठी गेल्या 50 दिवसांपासून धरणाच्या पाटचारीवर जंगलात धरणे आंदोलन सुरु आहे. मुंबई-आग्रा महामार्गावर कालवा जैसे थे ठेवावा व प्रकल्प राबवावा, या परस्परविरोधी मागणीसाठी आंदोलनही झालेत. त्यानंतर पोलिस बंदोबस्तात काम सुरु झाले. प्रकल्प पीडितांच्या मागण्यांना स्थानिक पातळीवर दुर्लक्षित केले जात असल्याच्या भावनेने भूषण कचवे, समाधान कचवे, नितीनचंद्र ठाकरे, प्रदीप शिंदे, अनिल बोरसे, निवृत्ती अहिरे, जगदीश कचवे, मनोज कचवे, गणेश कचवे, विकी कचवे यांनी नागपूर गाठत पालकमंत्रीभुसे यांच्या विरोधात निदर्शने करत प्रकल्प रद्द करण्यासाठी निवेदन दिले. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, प्रहार पक्षाचे आमदार बच्चू कडू, शिवसेनेचे नेते भास्कर जाधव, शेकाप नेते जयंतभाई पाटील, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आदींनी आंदोलकांची भेट घेतली. प्रकल्प रद्द न केल्यास मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी आंदोलन केले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, शासनातर्फे पाटबंधारे विभागाचे सचिव यांनी आंदोलकांना चर्चेस बोलावले असून शेतकर्‍यांनी जलसंपदा मंत्री फडणवीस यांच्याशीच चर्चा करण्याची भूमिका घेतली आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : बोरी अंबेदरी प्रकल्प पीडितांची नागपूरला निदर्शने appeared first on पुढारी.