नाशिक : बोरी प्रकल्पविरोधी स्थानबद्ध

बंदोबस्त www.pudhari.news

नाशिक (मालेगाव मध्य) : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील बोरी अंबेदरी धरणाचा कालवा सिमेंट पाइपबंद करण्याविरोधातील प्रकल्पबाधितांचे आंदोलन चिघळत चालले आहे. बेमुदत धरणे, महामार्ग रोखण्यास न्यायालयीन लढ्यानंतरही प्रशासनाकडून दाद मिळत नसल्याने आंदोलकांमध्ये अस्वस्थता वाढत आहे. यातून मंगळवारी (दि.10) आंदोलक शेतकरी व पोलिस प्रशासन यांच्यात वादविवाद झाला. पाटबंधारे विभागाचे अधिकारी, कर्मचारी न्यायालयीन आदेशानुसार धरण क्षेत्रात प्रकल्पाचे काम करण्यासाठी गेले असता शेतकर्‍यांनी चर्चेनंतरही काम करण्यास विरोध केल्याने पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन स्थानबद्ध केले.

बोरी-अंबेदरी धरणातून पालकमंत्री दादा भुसे यांच्या संकल्पेतून बंदिस्त कालवा प्रकल्प राबविला जात आहे. कालवा बंदिस्त करण्याला काही गावांतील शेतकर्‍यांचा विरोध आहे. गेल्या दोन महिन्यांपासून धरण क्षेत्रात धरणे आंदोलन सुरू आहे. दुसरीकडे हा प्रकल्प पूर्ण व्हावा यासाठी झोडगेसह परिसरातील शेतकरी आग्रही आहेत. त्यातून परस्परविरोधी आंदोलन, बैठका होऊन प्रश्न निकाली निघालेला नाही. कामाला स्थगित देण्याची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावताना याचिकेतील मुद्यांच्या आधारावर सहा आठवड्यांत सक्षम प्राधिकार्‍यांना अहवाल सादर करण्याचे आदेशित केले. दरम्यान, पाटबंधारे विभागाचे अधिकारी, कर्मचार्‍यांसह धरण क्षेत्रात प्रकल्पाचे काम सुरू करण्यासाठी गेले असता आंदोलकांनी त्यांना विरोध केला. चर्चा होऊ शकली नाही. त्यानंतर पोलिसांनी भूषण दगडू कचवे, निवृत्ती शांताराम अहिरे, प्रवीण मुरलीधर भामरे, समाधान दादाजी कचवे, नंदलाल भगवान कचवे, नितीन चंद्रगुलाब कचवे, प्रकाश दिगंबर बिचकुले, मधुकर नारायण शिंदे, सुनील मुलचंद निकम, दीपक नामदेव खैरनार, शांताराम काळू जाधव, दशरथ पवार, राजेंद्र नारायण कचवे, राकेश गोकुळ कचवे, नीलेश राजधर भामरे यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करीत स्थानबद्ध केले.

आणखी एक आंदोलक दवाखान्यात
आंदोलकांना पोलिस वाहनातून घेऊन जात असताना विजय कचवे या तरुण शेतकर्‍याची प्रकृती बिघडल्याने त्याला सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. यापूर्वी एका शेतकर्‍याने विषप्राशन, तर दुसर्‍या शेतकर्‍याने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.

डॉ. हिरेंचा आंदोलनाचा इशारा
मानसिक धक्का बसलेल्या शेतकर्‍याला उपचारही मिळू दिले नाहीत, ही दंडुकेशाही असून, त्याविरोधात बुधवारी (दि.11) अपर पोलिस अधीक्षक कार्यालयात आंदोलनाचा इशारा डॉ. अद्वय हिरे यांनी दिला आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : बोरी प्रकल्पविरोधी स्थानबद्ध appeared first on पुढारी.