नाशिक : भगवतीच्या चित्ररथाने फेडले डोळ्यांचे पारणे

vani www.pudhari.news

नाशिक (वणी) : पुढारी वृत्तसेवा

प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीच्या कर्तव्यपथावर संचलन झालेल्या चित्ररथाचे गुरुवारी (दि.16) वणी शहरात विशेष सादरीकरण करण्यात आले. जगभरातील प्रेक्षकांची मने जिंकलेल्या या चित्ररथाला सर्वोत्कृष्ट सादरीकरणाचा द्वितीय क्रमांक मिळाला आहे. साडेतीन शक्तिपीठांवर आधारित या चित्ररथाचे प्रदर्शन वणीत झाल्याने वातावरण चैतन्यमय झाले होते.

सकाळी दहाला वणी खंडेराव महाराज मंदिर पटांगणातून या चित्ररथाची मिरवणूक सुरू झाली. दिंडोरी तहसीलदार पंकज पवार व वणी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक नीलेश बोडखे यांनी चित्ररथाची पूजा करून सुरुवात केली. खंडेराव मंदिर, बसस्थानक, वणी पोलिस ठाणे, काॅलेज रस्त्यावरून हा चित्ररथ ग्रामपंचायतीसमोर आला. या ठिकाणी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महाआरती होऊन सांगता करण्यात आली. दिल्लीत कर्तव्यपथावर संचलन सोहळ्यात गौरवलेला हा महाराष्ट्राचा चित्ररथ वणीच्या पावनभूमीत आल्याने वणी ग्रामस्थांकडून जल्लोषात स्वागत करण्यात आले. सादरीकरणात शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग होता. विद्यार्थ्यांनी पारंपरिक नृत्य, आदिवासी नृत्य सादर केले. लेजीम पथकाने कार्यक्रमाची शोभा वाढविली. कार्यक्रमास हजारो महिला भाविकांनी हजेरी लावली. चित्ररथाचे संयोजक जयेश खोट यांचा सत्कार वणी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक नीलेश बोडखे, सरपंच मधुकर भरसठ, उपसरपंच विलास कड, महेंद्र बोरा, महेंद्र पारख यांच्या हस्ते करण्यात आला. डोळ्याचे पारणे फेडणारा हा प्रसंग टिपण्यासाठी वणीकरांसह भाविकांमध्ये प्रचंड उत्सुकता दिसून आली. सर्व नागरिकांनी व भाविकांनी या चित्ररथाच्या प्रदर्शनाचा मनमुराद आनंद घेतला. कार्यक्रमाचे नियोजन वणी येथे चित्ररथ समिती वणीचे दर्शन दायमा, पीयूष भवर, भास्कर पाटील, चेतन कुऱ्हाडे, प्रशांत कड, बाळासाहेब घडवजे, मयूर जैन, सतीश जाधव, संतोष दुसाने, प्रमोद भांबेरे, मनोज थोरात, दिगंबर पाटोळे, आबा मोर आदी समिती सदस्य, वणी सप्तशृंगी देवी ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद थोरात व विश्वस्त मंडळ, ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थ यांनी केले.

The post नाशिक : भगवतीच्या चित्ररथाने फेडले डोळ्यांचे पारणे appeared first on पुढारी.