नाशिक : भरपावसात रस्त्यावरच करावे लागले अंत्यसंस्कार

भरपावसात अंत्यसंस्कार,www.ppudhari.news

वणी : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा
सप्तशृंगगडाच्या पायथ्याशी असलेल्या व वणी बाजूकडून गडावर (रडतोंडी पायरी मार्ग) जाणार्‍या मार्गावरील चंडीकापूर गावात स्मशानभूमीच नसल्याने ग्रामस्थांना भरपावसात रस्त्यावरच अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली. मृत आत्म्याच्या वेदना मृत्यूनंतरही संपत नसल्याचा प्रत्यय नुकताच आला. अंतिम संस्कारावेळीसुद्धा पार्थिवाला होणार्‍या यातना पाहून शोकाकुल नातेवाइक व ग्रामस्थ अधिकच गहिवरले.

सप्तशृंगगड, चंडीकापूर परिसरात गेल्या चार-पाच दिवसांपासून दररोज मुसळधार पाऊस सुरू आहे. चंडीकापूर ग्रामपंचायतीचे उपसरपंच बाळू जोपळे यांच्या सून सविता मंगेश जोपळे (वय 22) यांचे रविवारी अल्प आजाराने निधन झाले. त्यांच्यावर दुपारी दीडच्या सुमारास चंडीकापूरला अंत्यविधी करण्याचे ठरले होते. चंडीकापूर येथे नोंदणीकृत स्मशानभूमी व शेड नसल्याने पूर्वपरंपरेनुसार बारव ओहळाच्या किनारी असलेल्या मोकळ्या जागेत अंत्यविधी करण्याची तयारी नातेवाइकांनी केली होती. अंत्यसंस्कारासाठी सरणही रचले. याचवेळी जोरदार पाऊस आल्याने बारव ओहळाला पूर येऊ लागल्याने ओहळाच्या किनारी रचलेले सरण वाहून जाऊ नये, म्हणून नातेवाईक व ग्रामस्थांनी धावपळ करीत रस्त्यावर आणले. चंडीकापूर-भातोडे रस्त्यावरील बारव ओहळाच्या पुलावर रस्त्याच्या बाजूला अंत्यविधी करण्याचा निर्णय घेऊन भरपावसात पुन्हा एकदा सरण रचून पार्थिवावर छत्रीचा आडोसा करून अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पावसामुळे लाकडे ओले झाल्याने डिझेलचा वापर करावा लागला.

चंडीकापूर येथे स्मशानभूमी नसल्याने पणजोबा, आजोबांपासून बारव नाल्यालगतच्या जागेत अंत्यसंस्कार विधी केला जात आहे. स्मशानभूमीसाठी ग्रामपंचायतीचा ठरावही प्रशासनास दिला आहे. मात्र, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. अनेक वर्षांपासून ग्रामस्थांची अंत्यसंस्कारासाठी गैरसोय होत आहे.
– निवृत्ती मोंढे, ग्रामपंचायत सदस्य, वणी

खासगी जागेचा आधार
चंडीकापूरला स्मशानभूमी नसल्याने वर्षानुवर्षे चंडीकापूर-भातोडे रस्त्यावर बारव ओहळाच्या किनारी खासगी जागेत अंत्यविधी केले जातात. परंतु जमीनमालकाचा विरोध आहे. पावसाळ्यात अंत्यविधी करताना ग्रामस्थांना मोठ्या हलाखीला तोंड द्यावे लागते. स्मशानभूमीसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी चंडीकापूरच्या सरपंच नंदा कुवर, दिंडोरी बाजार समितीचे संचालक पंडित बहिरम आदींनी केली आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : भरपावसात रस्त्यावरच करावे लागले अंत्यसंस्कार appeared first on पुढारी.