नाशिक : भाजीबाजाराने गुरुगोंविद स्कूलसमोर केला वाहतूकीचा खोळंबा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

इंदिरानगर-पाथर्डीरोडवरील गुरुगोविंद सिंग स्कूलसमोर सकाळ, सायंकाळ भरणाऱ्या भाजीबाजारामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून, ऐन शाळा भरण्याच्या वेळेत रोडवर दुतर्फा बसलेल्या विक्रेत्यांमुळे वाहनांचा खोळंबा हाेऊन विद्यार्थी, पालकांची मोठी गैरसोय होत आहे. या कोंडीत अपघात होण्याचा धोका असल्याने शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेत येथील बाजार बंद करण्याची मागणी होत आहे.

पाथर्डीगाव रोडवरील गुरुगोविंद सिंग स्कूल कॉम्पसमध्ये अभियांत्रिकी, पॉलिटेक्निक तसेच विविध अभ्यासक्रम चालविले जातात. त्यामुळे येथे सकाळी सातपासून विद्यार्थी-पालकांचा राबता असतो. मात्र, कोरोना काळात शाळा महाविद्यालय बंद असल्याने गुरुगाविंद सिंग शाळेमसोरील रस्त्यावर भाजीबाजार सुरू झाला आहे. आता शाळा, महाविद्यालये सुरू होऊन चार महिने उलटल्यानंतरही येथील भाजीबाजार नियमित सुरूच असून, त्यामुळे येथून ये-जा करणाऱ्या तसेच शाळा, महाविद्यालयाच्या वाहनांचा खोळंबा होत आहे. या गर्दीतून विद्यार्थ्यांना मार्ग काढावा लागतो. यातून विद्यार्थ्यांना अपघात होण्याचा धोका असल्याने येथील समस्येवर मार्ग काढण्याची मागणी करण्यात आली आहे.

झाडाच्या फांद्या धोकादायक : 

येथील गुलमोहराच्या दोन झाडांच्या फांद्या अत्यंत धोकादायक स्थितीत आहेत. त्या अचानक पडून अपघात होण्याचा धोका आहे. याबाबत स्थानिकांनी मनपाला निवेदनदेखील दिले आहे. मात्र, याबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे या धोकादायक फांद्या तोडून संभाव्य अपघात टाळण्याची मागणी करण्यात आली आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : भाजीबाजाराने गुरुगोंविद स्कूलसमोर केला वाहतूकीचा खोळंबा appeared first on पुढारी.