नाशिक : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भव्य मशाल रॅली

सुरगाणा; पुढारी वृत्तसेवा : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त माजी आमदार जे. पी. गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी रात्री दहा वाजता खोकरी फाटा येथून पायी मशाल रॅली काढण्यात आली. इंद्रजित गावित, माकप पदाधिकारी, किसान सभा, डीवायएफआय आणि तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी हातात मशाल आणि भारताचा तिरंगा ध्वज घेत स्वातंत्र्याच्या घोषणा दिल्या. रात्री अकरा वाजता ही रॅली सुरगाणा शहरात पोहोचली.

सुरगाणा शहरात माकपच्या कार्यकर्त्यांनी आणि शहर वासियांनी घोषणांच्या गजरात रॅलीचे स्वागत केले. खेड्यावरून आलेले हजारों कार्यकर्ते आणि शहरातील युवक, युवती, नागरिक हातात मशाल, तिरंगा घेऊन फेरीत सहभागी झाले. यावेळी आदर्श समता शिक्षण प्रसारक मंडळ अलंगुण या शिक्षण संस्थेच्या श्रीभुवन, उंबरपाडा, चिंचला, शहीद भगतसिंग, अलंगुण आश्रम येथील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमातून देशभक्ती आणि आदिवासी गीतांवर नृत्य करीत उपस्थितीतांची मने जिंकली.

जे. पी. गावीत म्हणाले की, स्वातंत्र्याच्या ५० व्या वर्षी एवढ्याच जोषात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या झेंड्याखाली देशाच्या स्वातंत्र्य दिनाचे स्वागत केले होते. त्यातील काही सहकारी आज आपल्याला सोडून गेले. मात्र, पुढील पिढीने ही परंपरा सुरू ठेवल्याचे समाधान वाटत आहे. स्वातंत्र्यसैनिकांचे बलिदान व्यर्थ जाऊ नये, यासाठी प्रत्येक नागरिकांनी हृदयात संविधान ठेऊन देशासाठी कार्यरत राहावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी सुरगाणाचे नगराध्यक्ष भरत वाघमारे, तालुक्यातील माकपचे कार्यकर्ते पदाधिकारी, इंद्रजित गावीत, सुभाष चौधरी, सुभाष चौधरी, सचिन महाले आदी उपस्थित होते.

हेही वाचलंत का ? 

The post नाशिक : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भव्य मशाल रॅली appeared first on पुढारी.