नाशिक : भुजबळ यांच्या अटकेच्या निषेधार्थ बसची झाली होती तोडफोड; दोघांना कारावास

कारावास www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांना मार्च 2016 मध्ये झालेल्या अटकेच्या निषेधार्थ शिंदे-पळसे येथील काही कार्यकर्त्यांनी नाशिक-पुणे महामार्गावर आंदोलन करत परिवहन मंडळाच्या बसची तोडफोड करून चालक व वाहकाला केलेल्या मारहाण प्रकरणी जिल्हा न्यायालयाने पळसे येथील दोघांना दोन वर्षे कारावास व प्रत्येकी 10 हजार रुपयांची शिक्षा सुनावली. गणेश गायधनी व बाळू चौधरी अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत.

भुजबळ यांना अटक झाल्याने शिंदे-पळसे येथे 17 मार्च 2016 रोजी काही कार्यकर्त्यांनी आंदोलन करीत बसची तोडफोड करीत वाहक व चालकाला मारहाण केली होती. या प्रकरणात नाशिकरोड पोलिस ठाण्यात रस्ता अडविणे, तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल आहे. सुनावणी सुरू असताना एका संशयिताचा मृत्यू झाला होता. सरकारी पक्षातर्फे ड. राजेंद्र बघडाने यांनी सहा साक्षीदार तपासले. वाहक-चालक व तपासी अंमलदारानी दिलेल्या साक्षी पुराव्यांआधारे जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एम. ए. शिंदे यांनी गणेश गायधनी व बाळू चौधरी यांना दोन वर्षे कारावास व 20 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. तसेच बसची नुकसानभरपाई म्हणून 15 हजार रुपये देण्याचे आदेश दिले. या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून पोलिस हवालदार साहेबराव शिरोळे यांनी कामकाज पाहिले.

The post नाशिक : भुजबळ यांच्या अटकेच्या निषेधार्थ बसची झाली होती तोडफोड; दोघांना कारावास appeared first on पुढारी.