नाशिक : मंद्यधुंद कंटेनरचालकाचे येवल्यात थैमान; अनेक वाहनांना उडवले, एक ठार

नाशिक

येवला (नाशिक); पुढारी वृत्तसेवा : येवला शहरातील नगर मनमाड राज्य महामार्गावर एका मद्यधुंद कंटेनर चालकाने अंधाधुंदपणे कंटेनर चालकवीत अनेक वाहनांना उडवले. या अपघातात अनेक वाहनचालक गंभीर झाले असून एकाचा मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळी ६ च्या सुमारास घडली. चालकाला पकडण्यात आले असून पोलिस या घटनेचा तपास करीत आहेत.

कोपरगाव वरुन मनमाडच्या दिशने जाणाऱ्या कंटेनरला मद्यधुंद अवस्थेतील चालक चालवत होता. कंटेनर चालकाने येवला शहरातील फत्तेबुरुज नाका ते विंचूर चौफुली दरम्यान अक्षरश: धुमाकूळ घातला. यावेळी कंटेनरला अनेक दुचाकी व चारचाकी वाहनांना धडक दिली. तसेच एका ट्रॅक्टर ट्रॉलीला धडक दिल्यानंतर कंटेनर मनमाडकडे सुसाट निघून गेला.

या घटनेत अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच अनेक जण जखमी असल्याची माहिती येत आहे. दरम्यान या अपघातात एक युवक ठार झाला आहे. रोशन मच्छिंद्र वाघमोडे (वय १९, रा. विखरणी, ता. येवला) असे ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. बहिणीच्या लग्नाची खरेदी करण्यासाठी तो येवला शहरात आलेला होता.

मनमाड जवळील अंकाई पाटी परिसरात सदरच्या कंटेनर चालकाला पकडण्यात आले. या ठिकाणी हा कंटेनर पलटी झाल्यामुळे हा कंटेनर चालक पोलिसांच्या हाती लागल्याचे समजते. या संदर्भात येवला शहर पोलिसांकडून तपास सुरू आहे.

अधिक वाचा :

The post नाशिक : मंद्यधुंद कंटेनरचालकाचे येवल्यात थैमान; अनेक वाहनांना उडवले, एक ठार appeared first on पुढारी.