नाशिक : मखमलाबादला नागपंचमी यात्रोत्सव उत्साहात, कुस्त्यांची दंगल रंगली

मखमलाबाद,www.pudhari.news

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा
मखमलाबाद ग्रामविकास मंडळ व नागपंचमी यात्रा पंचमंडळातर्फे आयोजित नागपंचमी यात्रोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. यानिमित्त आयोजित कुस्त्यांच्या दंगलीने लक्ष वेधून घेतले. तवली (अमृत उद्यान ) डोंगरावरील नागदेवतेच्या मंदिरात दर्शनासाठी मखमलाबाद ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. ग्रामदैवतअसलेल्या नागदेवतेला नैवेद्य दाखविण्यासाठी माहेरवाशीण व सासुरवाशीण यांनीही हजेरी लावली होती.

नागदेवतेचे दर्शन घेण्यासाठी पुरुषांबरोबर महिलांची संख्यादेखील लक्षणीय होती. दर्शनासाठी लांबलचक रांगा लागल्या होत्या. यात्रेनिमित्त बसस्थानकाकडून तवली डोंगराकडे जाणारा रस्ता भाविकांनी खचाखच भरलेला होता. बसस्थानक तसेच तवली डोंगराकडे जाणार्‍या रस्त्यावर गावात अनेक व्यावसायिकांनी हॉटेल, खेळण्यांची दुकाने, सौंदर्यप्रसाधने, खाऊची दुकाने थाटली होती. पिपाण्यांच्या आवाजाने सर्व परिसर दुमदुमून गेला होता. आजच्या आधुनिक युगात गावाचे गावपण जपणारे मखमलाबाद गाव व परिसर गर्दीने फुलून गेला होता. नागरिक गावाच्या जत्रेचा आनंद घेताना दिसून आले. यात नाशिक शहरासह तालुका, जिल्हा व राज्यस्तरीय नामवंत कुस्तीपटूंनी हजेरी लावली. यात हजारो रुपयांची अनेक बक्षिसे देण्यात आली. यात्रोत्सवात कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून म्हसरूळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक साखरे , सहायक निरीक्षक सुधीर पाटील, विनायक अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक घडवजे, भोसले आदींसह कर्मचार्‍यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

यावेळी कुस्ती पंच म्हणून मोतीराम पिंगळे, प्रभाकर पिंगळे, पहिलवान वाळू काकड, रामनाथ मानकर, अशोक हेंगडे, रतन तांबे, गोरख तिडके, दिलीप भालेराव, गंगाधर खोडे, सुरेश काकड, पुंडलिक खोडे, उमेश कोठुळे, ज्ञानेश्वर पिंगळे, शिवाजी गामणे यांनी काम पाहिले. यावेळी ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष कारभारी काकड, माजी सरपंच पंढरीनाथ पिंगळे, मिलिंद मानकर, नारायण काकड, रमेश काकड, पंडित पिंगळे, रमेश पिंगळे, लक्ष्मण शिंदे, रमेश माळी, मदन पिंगळे, दामोदर मानकर, नारायण काकड, शंकर पिंगळे, रामदास तिडके, रमेश काकड, भास्कर थोरात, संतू काकड, विनायक बुनगे, गणपत काकड, संजय फडोळ, डॉ. जगन्नाथ तांदळे, ज्ञानेश्वर काकड, प्रमोद पालवे, बाबूराव रायकर, अनिल काकड, विक्रम कडाळे, हिरामण मानकर, रामदास तिडके आदींसह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

घरोघरी नागदेवतेचे पूजन
नागपंचमीनिमित्ताने मंगळवारी (दि. 2) महिलावर्गाने घरोघरी मातीच्या नागदेवतेचे पूजन केले. यावेळी नागदेवतेच्या प्रतिमेला लाह्या व दुधाचा तसेच गोडाधोडाचा नैवेद्य दाखविण्यात आला. ग्रामीण भागात बळीराजाकडून मातीच्या नागाचे पूजन करून त्याच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. यावेळी बच्चेकंपनीसह महिलावर्गाने झोक्याचा आनंद घेत आनंदोत्सव साजरा केला.

हेही वाचा :

The post नाशिक : मखमलाबादला नागपंचमी यात्रोत्सव उत्साहात, कुस्त्यांची दंगल रंगली appeared first on पुढारी.