नाशिक : मखमलाबाद नाक्यावर वाहतूक कोंडी

Trafic jam www.pudhari.news

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा

अशोकस्तंभाकडून आलेल्या वाहनधारकांना पेठ व दिंडोरी रोडकडे जाण्यासाठी महत्वाचा आणि जुना मार्ग असलेल्या मखमलाबाद नाक्यावर सोमवारी (दि.२२) दुपारच्या सुमारास मोठी वाहतूक कोंडी झाली. एका बाजूला कोठारवाडीपर्यंत तर दुसऱ्या बाजूला पेठ नाक्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या चौकातील सिग्नल यंत्रणाही बंद असून, वाहतूक पोलीस नसल्याने वाहतूक पूर्णता खोळंबली होती. या ठिकाणी नेहमीच वाहतूक कोंडी होत असल्याने वाहनधारक हैराण झाले आहेत.

मखमलाबाद नाका रस्ता हा पंचवटीतील सर्वांत जुना असून, दिंडोरी रोड, पेठरोडकडून आलेले बहुसंख्य वाहनधारक अशोकस्तंभ, सीबीएस, गंगापूररोडसह रामवाडी, हनुमानवाडी, क्रांतीनगर, मखमलाबादकडे जाण्यासाठी याच रस्त्याचा वापर करतात. तसेच, मधुबन कॉलनी, राजपाल कॉलनीकडेही याच चौकातून जाण्याचा मार्ग आहे. गोदाघाट, मालेगांव स्टॅण्डकडे जातानाही वाहनधारकांना हा चौक ओलांडून जावे लागते. त्यामुळे या चौकातून दिवसभर वाहनांची मोठी वर्दळ असते. चारही बाजूने वाहनांची ये-जा असल्याने या चौकात नेहमीच वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे नागरिकांच्या मागणीवरून काही वर्षांपूर्वी या चौकात सिग्नल यंत्रणा बसविण्यात आली. वाहतूक पोलिसही या ठिकाणी ड्यूटी बजावत असतात. त्यामुळे काही प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या सुटली होती. मात्र बऱ्याचदा सिग्नल यंत्रणा बंद असल्याने वाहतूक कोंडी होत असते. सोमवारीदेखील सिग्नल यंत्रणा बंद असल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. तसेच, वाहतूक पोलिसही नसल्याने वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाल्याचे पहायला मिळाले. वाहनधारकांना बराच वेळ ताटकळावे लागल्याने चालकांनी नाराजी व्यक्त केली. सध्या सण-उत्सवाचे दिवस असल्याने येथील सिग्नल यंत्रणा नियमित सुरू असावी आणि वाहतूक पोलिसाची कायमस्वरूपी नेमणूक करावी, अशी मागणी वाहनधारकांनी केली आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : मखमलाबाद नाक्यावर वाहतूक कोंडी appeared first on पुढारी.