नाशिक : मनपाकडून जाहिरात परवाना शुल्कामध्ये 1 जानेवारीपासून चारपटीने वाढ

होर्डिंग, www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

व्यावसायिक व इतर जाहिरात परवाना शुल्कामध्ये वाढ करण्याचे आदेश मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी लागू केले असून, या शुल्कामध्ये तब्बल चारपटीने वाढ करण्यात आली आहे. यामुळे जाहिरात करणाऱ्या व होर्डिंग्जधारकांना या दरवाढीचा फटका सहन करावा लागणार आहे. येत्या १ जानेवारी २०२३ पासून हे जाहिरात दर लागू करण्यात येणार आहेत.

महापालिका क्षेत्रातील आकाश चिन्हे आणि जाहिरात प्रदर्शनाचे नियमन व नियंत्रण करणारे नियम ९ मे २०२२ रोजीच्या अधिसूचनेव्दारे करण्यात आलेले आहेत. मनपा क्षेत्रातील खासगी आणि शासकीय जागांमध्ये जाहिरात परवान्याकरिता परवाना शुल्क आकारणी केली जाते. सध्या मनपा क्षेत्रात व्यवसाय व बांधकामांमध्ये मोठ्या प्रमाणात होणारी वाढ व त्यानुसार जाहिरात क्षेत्रापासून मिळणारे उत्पन्न विचारात घेता मनपास परवाना शुल्कापासून मिळणारे उत्पन्न अल्प असल्याने त्यात वाढ होण्यासाठी परवाना शु्ल्कात तब्बल चारपटीने तर ४०० टक्के इतकी वाढ २९ डिसेंबर रोजी जारी केलेल्या आदेशाव्दारे करण्यात आली आहे. या आदेशाव्दारे मनपाच्या जाहिरात व परवाने विभागाने जाहिराती करण्यासाठी शहरातील प्रमुख ठिकाणे (प्राइम लोकेशन्स) यात वर्दळीचे चौक, शाळा, कॉलेजेस, मॉल, बसस्थानके, सिनेमागृह, बाजारपेठा, पर्यटनस्थळे, उद्याने परिसर रस्ता, जॉगिंग ट्रॅक अशा विभागनिहाय ठिकाणे जाहिरात व परवाने विभागाने निश्चित केले असून, जागेनुसार अ आणि ब याप्रमाणे वर्गीकरण करण्यात आले आहेत.

विभागनिहाय प्राइम लोकेशनची संख्या

पंचवटी विभागात २७, नाशिक पूर्वमध्ये ११, सातपूर विभागात १३, सिडको विभागात २६, नाशिक पश्चिम विभागात ३३ तर नाशिकरोड विभागात १९ याप्रमाणे शहरात १२९ जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. यात सर्वाधिक जाहिरातींच्या ठिकाणांची संख्या पश्चिम विभागात असून, सर्वाधिक कमी संख्या नाशिक पूर्वमध्ये आहे.

दर तीन वर्षांनी १५ टक्के वाढ

महापालिकेने केलेल्या सुधारित जाहिरात परवाना शुल्कामध्ये दर तीन आर्थिक वर्षांनी १५ टक्के वाढ २०२५-२६ या वर्षापासून लागू केली आहे. यामुळे जाहिरातदार तसेच होर्डिंगधारकांना तीन तीन वर्षांनी या दरवाढीला सामोरे जावे लागणार आहे. १ जानेवारी २०२३ पासून नवीन व नूतनीकरणाने जाहिरात फलक, आकाश चिन्हे, होर्डिंग याकरता तसेच तात्पुरत्या स्वरूपाच्या जाहिरातींना मनपाच्या नागरी सुविधा केंद्राव्दारे (सीएफसी) संगणकीय आज्ञावलीने परवाना देण्यात येणार आहेत. त्यानुसार संबंधित माहिती व तंत्रज्ञान विभागाने अशा परवान्यात आवश्यक त्या सुधारणा करण्याचे निर्देश आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी दिले आहेत.

सुधारित परवाना शुल्क घेणार

आकाशचिन्ह, जाहिरात फलक व होर्डिंग यांना यापूर्वी २०२३-२४ साठी परवाने जुन्या परवाना शुल्कानुसार देण्यात आले आहेत. मात्र, अशा सर्व संबंधितांना आता २०२३-२४ साठी परवान्याकरिता सुधारित परवाना शुल्काप्रमाणे फलकाचे शुल्क भरणे आवश्यक आहे. त्यानुसार ३१ जुलै २०२३ पर्यंत परवानाधारकांना परवाना शुल्क फरकाची रक्कम भरण्यास मुदत देण्यात आली आहे.

मनपाच्या आर्थिक स्थितीचा विचार करता महसुलात वाढ व्हावी, यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून महसूल वाढविण्याचा प्रयत्न आहे. शासन आदेशानुसार व महागाई निर्देशांकाप्रमाणे जाहिरात परवाना शु्ल्कामध्ये वाढ केली आहे. मागील वर्षापर्यंत मनपाला जाहिरात परवाना शुल्कातून सुमारे दीड कोटी इतका महसूल मिळाला आहे. शुल्कवाढीमुळे त्यात आणखी वाढ होईल.

– अर्चना तांबे, उपआयुक्त- कर आकारणी विभाग, मनपा

हेही वाचा :

The post नाशिक : मनपाकडून जाहिरात परवाना शुल्कामध्ये 1 जानेवारीपासून चारपटीने वाढ appeared first on पुढारी.