नाशिक : मनपाचे अंदाजपत्रक आता ३ मार्चला होणार सादर

नाशिक मनपा,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महापालिकेचे २०२२-२३ या आर्थिक वर्षाचे सुधारित आणि २०२३-२४ चे प्रारूप अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक २७ फेब्रुवारी नव्हे, तर दि. ३ मार्च रोजी सादर करण्याचा निर्णय मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी घेतला आहे. प्रथम स्थायी समिती आणि त्यानंतर महासभेत हे आयुक्तांचे अंदाजपत्रक प्रशासक म्हणून डॉ. पुलकुंडवार मंजूर करतील. नव्या आर्थिक वर्षात कोणत्याही प्रकारची कर दरवाढ न लागू केल्याने नाशिककरांमधून समाधान व्यक्त होत आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून मनपाच्या २०२२-२३ या आर्थिक वर्षाचे सुधारित, तर २०२३-२४ या आर्थिक वर्षाचे प्रारूप अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक अंतिम करण्याची कार्यवाही सध्या सुरू आहे. अजूनही काही खातेप्रमुखांकडून सविस्तर आकडेवारी लेखा व वित्त विभागाकडे सादर न झाल्याने अंदाजपत्रक सादर करण्याची तारीख २७ फेब्रुवारीवरून ३ मार्चपर्यंत पुढे ढकलावी लागली आहे. मनपा कायद्यातील तरतुदीअंतर्गत मनपा आयुक्त जमा व खर्च बाजू अंदाजपत्रकाद्वारे स्थायी समितीकडे सादर करतात. स्थायी समितीकडून आयुक्तांचे अंदाजपत्रक मंजूर करून जमा-खर्चामध्ये वाढ करून अंदाजपत्रक महासभेच्या अंतिम मान्यतेसाठी सादर केले जाते. सर्वसाधारणपणे २८ फेब्रुवारीअखेर स्थायी समितीमार्फत अंदाजपत्रक मंजूर करण्याचा प्रघात आहे. यानंतर दि. ३१ मार्चअखेर स्थायी समितीने शिफारशी केलेल्या अंदाजपत्रकाला महासभेची अंतिम मंजुरी दिली जाते. परंतु, महापालिकेत सध्या प्रशासकीय राजवट सुरू असल्याने आयुक्त डॉ. पुलकुंडवार स्थायी समितीला प्रारूप अंदाजपत्रक सादर करतील आणि प्रशासक म्हणून तेच अंदाजपत्रकाला स्थायी समिती आणि महासभेत मंजुरी देतील.

आयुक्तांचेच अंदाजपत्रक अंतिम

२०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी तत्कालीन आयुक्तांनी २,२२७ कोटींचे प्रारूप अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक स्थायीकडे मंजुरीसाठी सादर केले होते. स्थायीने अंदाजपत्रकात ३३९ कोटी ९७ लाखांची भर घातली. मात्र, हे मंजूर अंदाजपत्रक महासभेकडे सादर करण्यापूर्वीच महापालिकेचा पंचवार्षिक कालावधी संपुष्टात आला. त्यामुळे आयुक्तांचेच प्रारूप अंदाजपत्रक अंतिम ठरले आणि सध्या महापालिकेत त्याच अंदाजपत्रकाची अंमलबजावणी सुरू आहे.

२८ फेब्रुवारीअखेर अंदाजपत्रक सादर केले पाहिजे, असा काही नियम नाही. अंदाजपत्रकाशी संबंधित काही कामे प्रलंबित असल्याने ते पूर्ण करण्यासाठी अंदाजपत्रक सादर करण्याची तारीख पुढे ढकलली असून, साधारण अंदाजपत्रक ३ मार्च रोजी सादर केले जाणार आहे.

– डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, आयुक्त-मनपा

हेही वाचा :

The post नाशिक : मनपाचे अंदाजपत्रक आता ३ मार्चला होणार सादर appeared first on पुढारी.