नाशिक : मनपाचे उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार जाहीर; ‘हे’ आहेत पुरस्कारार्थीं

नाशिक मनपा,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक महापालिका शिक्षण विभागाचे 2022-23 या शैक्षणिक वर्षाकरिता उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार शुक्रवारी (दि. 2) जाहीर करण्यात आले. यासाठी शिक्षकांकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते. शासनाने गठीत केलेल्या ‘उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार’ समितीने मनपा प्राथमिक विभागातून सहा आणि खासगी प्राथमिक शाळांमधून चार अशा एकूण 10 शिक्षकांची पुरस्कारासाठी निवड केली आहे.

उत्कृष्ट शिक्षक निवड समितीने शिक्षण विभागाकडे प्राप्त झालेल्या प्रस्तावांची छाननी करून मागील पाच वर्षांचे गोपनीय अहवाल, स्थानिक सहभागातून उपक्रम, सामाजिक कार्य, वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम, गुणवत्ता, विकासात संबंधित वर्गाचे कामकाज, चाचणीचे निकाल, गुणवत्तावाढीसाठी केलेले प्रयत्न, वर्ग पातळीवरील उपक्रम, नवोपक्रम, कृती संशोधन, शिष्यवृत्ती व इतर स्पर्धा परीक्षा, विज्ञान प्रदर्शन व सहभाग, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी केलेले प्रयत्न, राष्ट्रीय कार्यक्रमात सहभाग, कोविड 19 काळातील उपक्रम, विद्यार्थी, शिक्षक ऑनलाइन शिक्षण, विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी केलेले प्रयत्न, स्वत:ची कार्यक्षमता टिकवून ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न, उपक्रम व घेतलेले प्रशिक्षण लोकसहभागातून मिळविलेले साहित्य प्रकाशित लेख, पुस्तके, शोधनिबंध, प्रबंध, हस्तलिखिते या सर्व निकषांचा अभ्यास करून शिक्षकांची उत्कृष्ट शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

उत्कृष्ट शिक्षक निवड करण्यासाठी उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष तथा मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, समितीचे उपाध्यक्ष सुरेश खाडे, राज्य पुरस्कारविजेते शिक्षक पी. बी. हिंगमिरे, प्राचार्या मनीषा देवरे, मनपा प्रशासनाधिकारी सुनीता धनगर यांनी कामकाज पाहिले.

पुरस्कारार्थींची नावे अशी…
मनपा शाळा : मुख्याध्यापिका छाया माळी (शाळा क्र. 67, शिवाजीवाडी), मुख्याध्यापिका वैशाली ठोके (शाळा क्र. 78, अंबड), उपशिक्षिका कमल दाते (शाळा. क्र. 3, नांदूर), उपशिक्षिका रूपाली चव्हाण (शाळा क्र. 77, अंबड), उपशिक्षक महेंद्र जाधव (शाळा क्र. 74, जाधव संकूल), उपशिक्षिका गायत्री सोनवणे (शाळा क्र. 10, पंचवटी), खासगी प्राथमिक शाळा – उपशिक्षक नीलेश तिवारी (मॉडर्न एज्यूकेशन सोसायटी प्राथमिक विद्यालय, अशोकनगर), मुख्याध्यापिका कल्पना कराड (नूतन मराठी प्राथमिक शाळा), मुख्याध्यापक नितीन पाटील (सुखदेव प्राथमिक मराठी विद्यामंदिर, इंदिरानगर), उपशिक्षिका सविता कुलकर्णी (नाशिकरोड).

The post नाशिक : मनपाचे उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार जाहीर; 'हे' आहेत पुरस्कारार्थीं appeared first on पुढारी.