नाशिक : मनपाचे पूर्व विभागीय कार्यालय हलविणार

भालेकर मैदान,www.pudharii.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मेनरोडवरील महापालिकेची इमारत धोकादायक बनल्याने तेथील पूर्व विभागीय कार्यालय आता महापालिकेच्या बी. डी. भालेकर शाळेच्या इमारतीत हलविण्यात येणार असून, त्याआधी शाळेच्या इमारतीची स्थिरता (स्टॅबिलिटी) तपासण्यात येणार आहे.

महापालिकेचे पूर्व विभागीय कार्यालय असलेली मेनरोडवरील दगडी इमारत ही बि—टिशकालीन इमारत आहे. या इमारतीला ऐतिहासिक महत्त्व आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपूर्वी इमारतीच्या मागील बाजूचा काही भाग ढासळला होता. धोकादायक इमारतीमुळे महापालिका प्रशासनाने इमारतीतील काही विभागांचे कामकाज पश्चिम विभागीय कार्यालयात स्थलांतरित केले होते. तर काही विभागांचे कामकाज आजही त्याच इमारतीत होत आहे. पूर्व विभागीय कार्यालयासाठी नवीन इमारत बांधण्यासाठी द्वारका येथील मनपाची जागाही निश्चित करण्यात आलेली आहे. मात्र, या जागेचा वाद न्यायालयात सुरू असल्याने तूर्तास मेनरोडवरील इमारतीत सुरू असलेले कामकाज भालेकर शाळेच्या इमारतीत तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या पूर्व विभागाचे काम हे पश्चिम विभागीय कार्यालयाच्या इमारतीतून सुरू आहे.

याठिकाणी दोन्ही विभागीय कार्यालयांना जागा अपुरी असल्याने तसेच पार्किंगचा प्रश्न निर्माण होत असल्याने भालेकर शाळेच्या वरच्या दोन मजल्यांवर पूर्व विभागीय कार्यालय स्थलांतरित करण्याचा मनपाचा निर्णय आहे. विभाग स्थलांतरित होण्यापूर्वी इमारतीची डागडुजी केली जाणार आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : मनपाचे पूर्व विभागीय कार्यालय हलविणार appeared first on पुढारी.