नाशिक मनपाचे २८ हजार विद्यार्थी यंदा गणवेशाविना?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शाळा सुरू होण्यास अवघे १५ दिवस शिल्लक असले, तरी महापालिका शाळांच्या विद्यार्थ्यांना गणवेश उपलब्ध करून देण्याची कुठलीही तयारी झाली नसल्याची बाब समोर येत आहे. मागील आठवड्यात शिक्षणमंत्र्यांनी सर्व शाळांसाठी एकच गणवेश असेल, असा निर्णय घेणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे महापालिकेचा शिक्षण विभाग संभ्रमावस्थेत असून, विद्यार्थ्यांना वेळेत गणवेश मिळणार काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

महापालिकेच्या शहरात 100 हून अधिक शाळा आहेत. त्यामध्ये २८ हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यापैकी राखीव प्रवर्गातील १८ हजार विद्यार्थ्यांना राज्य शासनाकडून गणवेश दिला जातो, तर उर्वरित 10 हजार विद्यार्थ्यांच्या गणवेशाचा खर्च मनपा स्वत: करते. दरवर्षी शाळा सुरू होऊन दोन महिने लोटतात, तरी विद्यार्थ्यांना गणवेश मिळत नाही. त्यामुळे मनपा शिक्षण विभागाला टीकेचे धनी व्हावे लागते. यंदा खबरदारी घेत मागील फ्रेबुवारी महिन्यातच मनपा शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांचे माप घेऊन गणवेश १५ जूनपूर्वी मिळावा यासाठी ऑर्डर दिली होती. पण राज्याचा शिक्षण विभाग एक राज्य एक गणवेश या योजनेची अंमलबजावणी करण्याच्या तयारीत आहे. यावर्षीपासून राज्यातील प्रत्येक सरकारी शाळेतील विद्यार्थी एकाच गणवेशात दिसतील. सर्व सरकारी शाळांसाठी आता एकच गणवेश लागू असेल. या निर्णयामुळे मनपा प्रशासनाची कोंडी झाली आहे. नवीन गणवेश नियम लागू झाल्यास यापुर्वीच ऑर्डर दिलेल्या 10 हजार गणवेशाचे करायचे काय, या कोंडीत शिक्षण विभाग सापडला अ‍ाहे. त्यासाठी मनपा शिक्षण विभागाला राज्य शासनाच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षात दोन गणवेश दिले जातात. एक राज्य एक गणवेश नियम लागू झाल्यावर दुसरा गणवेश राज्य शासनाच्या निर्णयानुसार दिला जाईल, अशी तयारी मनपा शिक्षण विभागाने केली आहे. मात्र प्रारंभीचे सहा महिने ज्या गणवेशांची यापूर्वीच ऑर्डर दिली तेच विद्यार्थी वापरावे लागतील अशी माहिती मनपा शिक्षण अधिकार्‍यांनी दिली. दरम्यान, राज्यातील सरकारी शाळांमध्ये एकच गणवेश करायचा असल्यास त्या संदर्भात अधिकृत निर्णय तातडीने घ्यावा, अशी मागणी शाळा व्यवस्थापनांकडून होत आहे.

हेही वाचा:

The post नाशिक मनपाचे २८ हजार विद्यार्थी यंदा गणवेशाविना? appeared first on पुढारी.