नाशिक : मनपाच्या भूखंडावर अतिक्रमण झाल्यास अधिकारीच जबाबदार- आयुक्त डॉ. पुलकुंडवार

नाशिक मनपा आयुक्त पुलकुंडवार,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मनपाच्या स्वमालकीच्या कोट्यवधींचे खुले भूखंड व आरक्षित जागा अतिक्रमणधारकांनी गिळंकृत केल्याच्या तक्रारींची आयुक्तांनी गंभीर दखल घेतली आहे. विभागनिहाय मनपाच्या मालमत्तेचे सर्वेक्षण करून पंधरा दिवसांत अहवाल सादर करावे. भविष्यात अतिक्रमण झाल्यास संबंधित विभागप्रमुख व विभागीय अधिकार्‍यांना जबाबदार धरण्यात येईल, असा इशारा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिला आहे.

लेआउट मंजूर करताना खुल्या जागांच्या सातबार्‍यांवर महापालिकेची नोंद होते. मात्र, शहरातील अनेक मोक्याच्या ठिकाणी असलेल्या मनपाच्या भूखंडावर झोपडपट्टीधारकांसह परिसरातील भूमाफियांकडून अनधिकृत कब्जा केला जातो. महापालिकेच्या मालकीच्या अनेक जागांवर व्यावसायिक अतिक्रमणे उभी राहिल्याचे चित्र आहे. या अतिक्रमणांविरोधात तक्रारी प्राप्त झाल्यानंतर त्याकडे डोळेझाक केली जाते. अतिक्रमण विभागातील अधिकारी-कर्मचारी चिरीमिरी घेऊन कारवाई करत नसल्याचे नेहमी ऐकावयास मिळते. गंगापूर रोडवरील महापालिकेच्या मालकीची जागा एका बड्या बांधकाम व्यावसायिकाने बळकावल्याची तक्रार गेल्या आठवड्यात एका माजी नगरसेवकाने केली होती. त्यानंतर मनपाच्या मालकीच्या खुले भूखंड, आरक्षित जागांवरील अतिक्रमणांचा प्रश्न चव्हाट्यावर आला होता. त्या पार्श्वभूमीवर मनपाच्या मालमत्तांसह उद्याने व रस्ते या ठिकाणी अतिक्रमण होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आदेश आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी दिले आहेत. दरम्यान, विभागनिहाय पाहणी करून सद्यस्थिती अहवालासह सादर करण्याचे निर्देश आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी दिले आहेत.

विनाकार्यवाही तक्रारी निकाली
महापालिका अ‍ॅपसह शासनाच्या विविध पोर्टलवर तक्रारी प्राप्त होत असतात. या तक्रारी संबंधित विभागप्रमुख, विभागीय अधिकार्‍यांनी निकाली अपेक्षित आहे. मात्र, काही तक्रारी विनाकार्यवाही निकाली काढण्यात आल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आले आहे. संबंधित अधिकार्‍यांना आयुक्तांनी तंबी दिली आहे.

The post नाशिक : मनपाच्या भूखंडावर अतिक्रमण झाल्यास अधिकारीच जबाबदार- आयुक्त डॉ. पुलकुंडवार appeared first on पुढारी.