नाशिक : मनपाच्या “वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पासाठी केवळ दीड मे. टन फूड वेस्टेज

नाशिक,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

मनपाच्या खतप्रकल्पातील वेस्ट टू एनर्जी या वीजनिर्मिती करणाऱ्या प्रकल्पासाठी शहरातून १५ मेट्रिक टन फूड वेस्टेज अपेक्षित असताना केवळ दीड टन फूड वेस्टेज संकलित होत असल्याची बाब शहरातील हॉटेल व्यावसायिकांबरोबर झालेल्या बैठकीतून समोर आली. कमी प्रमाणात वेस्टेज मिळत असल्याने वीजनिर्मितीवर त्याचा परिणाम झाला आहे. दीड टन वेस्टेजच्या माध्यमातून केवळ २०० ते २५० किलो वॉट वीजनिर्मिती होत आहे. संबंधित प्रकल्पासाठी १५ मे. टन फूड वेस्टेज मिळाल्यास ३३०० किलो वॉट वीजनिर्मिती होऊ शकते.

नाशिक महापालिका मुख्यालयात शुक्रवारी (दि.२०) आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील हॉटेल व्यावसायिकांची बैठक झाली. स्वच्छ सर्वेक्षण २०२३ अंतर्गत नाशिक शहराचा क्रमांक उंचावण्यासाठी बैठकीत विविध मुद्यांवर चर्चा झाली. आयुक्तांनी इंदूर शहराचे उदाहरण सांगत तेथील बदललेली जीवनपद्धती सांगितली. प्रत्येक नागरिकाने ‘माझे शहर स्वच्छ आहे. ते मी घाण होऊ देणार नाही’ यासाठी दक्ष राहिले पाहिजे. शहर स्वच्छ राहण्यासाठी कचऱ्याचे वर्गीकरण महत्त्वाचे असल्याचे आयुक्तांनी सांगितले. ‘मानवतेची भिंत’ उभारून तेथे वापरण्यायोग्य कपडे, वस्तू ठेवण्याचे आवाहनही आयुक्तांनी केले. बैठकीला शहर अभियंता शिवकुमार वंजारी, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड, अधीक्षक अभियंता उदय धर्माधिकारी, हॉटेल आणि बार असोसिएशनचे अध्यक्ष संजय चव्हाण आणि शहरातील हॉटेल व्यावसायिक उपस्थित होते.

डॉ. आवेश पलोड यांनी ओला कचरा, सुका कचरा वेगळा हवा असल्याचे सांगून वेस्टेज फूड वेगळ्या कंटेनरमध्ये द्यावे, असे आवाहन हॉटेल व्यावसायिकांना केले. ५० ते १०० किलोपेक्षा जास्त ओला कचरा असल्यास त्याची विल्हेवाट संबंधित आस्थापने लावू शकतात. त्यासाठी कम्पोस्टिंग, बायोगॅस असे पर्याय आहेत. लवकरच केटरर्स आणि मॅरेज हॉल व्यावसायिकांचीही बैठक घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. उदय धर्माधिकारी यांनी वेस्ट टू एनर्जी प्लँटबाबत माहिती देऊन शहरातून १५ मेट्रिक टन फूड वेस्टेज अपेक्षित असल्याचे सांगितले.

बैठकीला जनसंपर्क अधिकारी गिरीश निकम, प्रशांत ठोके, मोहित जगताप, विशाल तांबोळी आणि मनपाचे सहा विभागीय स्वच्छता निरीक्षक उपस्थित होते. हॉटेल आणि बार असोसिएशनचे पदाधिकारी श्रीधर शेट्टी, ताज हॉटेलचे हनुमंत शिंदे, नाशिक क्लबचे किशोर पुंड, याहू हॉटेलचे मोहन पाटील आणि इतर हॉटेलचे असे ३० प्रतिनिधी उपस्थित होते.

६४ ठिकाणे विकसित करणार

शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांनी वाहतूक बेटे, दुभाजकाबाबत हॉटेल व्यावसायिक १० वर्षांसाठी प्रायोजकत्व घेऊन त्यांच्या देखभालीची जबाबदारी घेऊ शकतात. बांधकाम विभागाने शहरात अशी ६४ ठिकाणे प्रायोजक तत्त्वावर विकसित करण्यासाठी निश्चित केली आहेत, अशी माहिती दिली. प्रायोजक असलेले दिशादर्शक बोर्ड टॅक्स फ्री करण्याची सूचना हॉटेल आणि बार असोसिएशनचे अध्यक्ष संजय चव्हाण यांनी केली.

हेही वाचा :

The post नाशिक : मनपाच्या "वेस्ट टू एनर्जी' प्रकल्पासाठी केवळ दीड मे. टन फूड वेस्टेज appeared first on पुढारी.