नाशिक मनपातील पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा होणार

नाशिक महानगरपालिका www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय, अग्निशमन विभागासाठी कायमस्वरूपी भरती प्रक्रिया राबविण्याच्या दृष्टीने पुढील आठवड्यात टीसीएस या संस्थेशी महापालिकेचा करारनामा होणार आहे. करारनामा झाल्यानंतर मनपाच्या बहुप्रतीक्षित असलेला ७०१ पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा होणार आहे.

शासनाने नाशिक महापालिकेला आरोग्य वैद्यकीय विभाग आणि अग्निशमन विभागातील जवळपास ७०१ पदांच्या सरळसेवा भरती प्रक्रियेसाठी मागील वर्षी मंजुरी दिली होती. त्यासाठी शासनाने नामनिर्देशित केेलेल्या संस्थांपैकी आयबीपीएस आणि टीसीएस या दोन संस्थांची निवड महापालिकेने केली होती. त्यानुसार मनपाच्या प्रशासन विभागाने संबंधित दोन्ही संस्थांना पत्र देऊन त्यांच्या अटीशर्ती तसेच भरती प्रक्रिया कशी राबविणार, त्यासाठीचे शुल्क किती आकारणार, याबाबतची माहिती मागविली होती. त्यासंदर्भात आयबीपीएसने भरती प्रक्रियेसाठी होकार कळविला होता. मात्र त्यानंतर करारनामा करण्याविषयी संस्थेने काहीच कार्यवाही केली नाही वा तसे स्वारस्यही दाखविले नाही. त्यामुळे प्रशासन विभागाने टीसीएस संस्थेशी संपर्क साधून भरती प्रक्रियेविषयी विचारणा केली असता, टीसीएसने उत्सुकता दाखविली असून, आता या संस्थेबरोबर करारनामा होणे तेवढे बाकी आहे. संस्थेच्या प्रतिनिधींबरोबर मनपाची बैठक होऊन आढावा घेण्यात आला असून, पुढील आठवड्यात मनपा आणि टीसीएस यांचा करारनामा पूर्ण होऊन भरती प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिली.

आस्थापना खर्चाची अट एकवेळेसाठी शिथिल

महापालिकेचा आस्थापना खर्च वाढता असल्याने महापालिकेसमोर भरती करण्याचे आव्हान उभे राहिले होते. मात्र, शासनाने आस्थापना खर्चाची अट एकवेळेसाठी शिथिल केल्याने तसेच सध्या मनपाचा आस्थापना खर्चही ३५ टक्क्यांपर्यंत आल्याने मनपाच्या भरती प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला आहे.

हेही वाचा:

The post नाशिक मनपातील पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा होणार appeared first on पुढारी.