नाशिक मनपातील लाचखोर तांत्रिक सहायक गजाआड

मनपातील लाचखोर तांत्रिक सहायक गजाआड ,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

ठेकेदाराकडे २५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून २४ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या महापालिकेतील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंबड विभागीय कार्यालयातील तांत्रिक सहायकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. भाऊराव काळू बच्छाव (४५, रा. राणेनगर) असे या संशयित लाचखोराचे नाव आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करणारे ठेकेदार आहेत. तक्रारदाराने केलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या कामादरम्यान महापालिकेच्या डांबरी रस्त्यापलीकडे केबल टाकण्याकरिता त्यांनी बच्छाव यांच्याकडे रस्ता खोदण्याची परवानगी मागितली. परवानगी देण्याच्या मोबदल्यात बच्छाव यांनी ठेकेदाराकडे २५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यामुळे ठेकेदाराने तक्रार केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारीची शहानिशा करून सापळा रचला. त्यानुसार बुधवारी (दि.१४) बच्छाव यांनी पंचासमोर तक्रारदार ठेकेदाराकडून लाचेचे २४ हजार रुपये स्वीकारले. त्यानंतर विभागाने बच्छाव यास लाच घेताना रंगेहाथ पकडले. विभागाचे उपअधीक्षक अभिषेक पाटील, पोलिस निरीक्षक संदीप साळुंखे, कर्मचारी असई सुखदेव मुरकुटे, पोलिस नाईक मनोज पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.

हेही वाचा :

The post नाशिक मनपातील लाचखोर तांत्रिक सहायक गजाआड appeared first on पुढारी.