नाशिक : मनपा अर्थसंकल्पातून ३३३ कोटी गायब; भ्रष्टाचार केल्याचा बडगुजर यांचा आरोपप

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

२०२३- २४ या आर्थिक वर्षातील सार्वजनिक विभागातील रस्ते बांधणे, पूल व सांडवे बांधणे यासारखी ‘अ’ यादीमध्ये एकुण २० कामे आहेत. त्या कामांची मुदत मार्च २०२४ पूर्वी संपुष्टात येणार आहे. त्याचे दायित्व मार्च २०२४ अखेर ३२५ कोटी आहे. मात्र लेखाधिकाऱ्यांनी मार्च अखेर ४३ कोटींचे दायित्व दर्शविलेले असून, यामध्ये सुद्धा २८२ कोटींची तफावत आहे. त्यामुळे अर्थसंकल्पाची जमा बाजू व खर्च बाजूवर विपरीत परिणाम होणार आहे. शिवाय या दोन्ही हेडमध्ये मनपाचे अ यादीतील दायित्व ३३३ कोटीने कमी दर्शवून महापालिकेची फसवणूक करीत, अर्थसंकल्पात भ्रष्टाचार केल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी केला आहे.

महापालिका आयुक्तांना निवेदन देत, याप्रकरणातील दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी देखील बडगुजर यांनी निवेदनाद्वारे केली आहे. त्यांनी निवेदनात म्हटले की, सर्व वर्क आॅर्डरची मुदत मार्च २०२४ पूर्वी संपुष्टात येत असताना दायित्व कमी दर्शवून नवीन कामाच्या निविदा काढण्यासाठी केलेली कृती आहे. त्यामध्ये आर्थिक भ्रष्टाचार करण्याच्या उद्देशानेच अर्थसंकल्प तयार केलेला आहे. ठराविक लोकांना फायदा होईल, या वृत्तीने लेखा विभागाने काम केलेले आहे. सर्व समावेशक भूमिका अर्थसकंल्पामध्ये दिसत नाही, तोपर्यंत न्यायालयीन बाबी लढविणे गरजेचे असून, वरिल सर्व कामांच्या कार्यारंभ आदेशाच्या प्रती मिळाव्यात अशी विनंती केली आहे. दरम्यान, अर्थसकंल्पामध्ये त्रुटी असल्याचा २८ मार्च २०२३ रोजी दिलेल्या पत्रातून निर्दशनास आणून दिले होते. मात्र, अशातही मुख्याधिकाऱ्यांकडून कुठल्याही प्रकारचा खुलासा केला गेला नाही. वेळोवेळी पाठपुरावा करून देखील उत्तर दिले गेले नाही. किंवा अर्थसंकल्पात तशी दुरुस्ती केली नसल्याचेही बडगुजर यांनी निवेदनात म्हटले आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : मनपा अर्थसंकल्पातून ३३३ कोटी गायब; भ्रष्टाचार केल्याचा बडगुजर यांचा आरोपप appeared first on पुढारी.