नाशिक : मनपा आयुक्तांकडून श्रीगणेश विसर्जन मिरवणूक मार्गाची पाहणी

नाशिक मनपा आयुक्त पाहणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी शुक्रवारी श्रीगणेश विसर्जन मिरवणूक मार्गाची पाहणी करत रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजविण्याचे आदेश बांधकाम विभागाला दिले आहेत. त्याचबरोबर मिरवणूक मार्गावरील अतिक्रमणे, रस्त्यांवर लोंबकळणार्‍या वीजतारांचे अडथळे दूर करण्यात येणार असल्याचे मनपा आयुक्तांनी सांगितले.

महापालिका आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांच्यासह अधिकार्‍यांबरोबर मिरवणूक मार्गाची पाहणी केली. सारडा सर्कल ते दूधबाजार, भद्रकाली मार्केट, मेनरोड, महाबळ चौक, महात्मा गांधी रोड, अशोकस्तंभ, रविवार कारंजा, पंचवटी कारंजामार्गे गौरी पटांगण या मार्गाने गणेश विसर्जन मिरवणूक असते. त्यानुसार या मार्गाची पाहणी करत अधिकार्‍यांना विविध सूचना केल्या. यावेळी मनपा शहर अभियंता शिवकुमार वंजारी, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड, मनपाच्या पंचवटी, पूर्व, पश्चिम विभागातील स्वच्छता निरीक्षक पाहणी दौर्‍यास उपस्थित होते.

रविवार कारंजा परिसरात पडलेल्या वाड्याची माती आणि इतर डेबि—ज मटेरियल तातडीने उचलून घेण्याची सूचना करण्यात आली. तसेच महाबळ चौकातील वाहतूक बेट दुरुस्त करण्यात येऊन स्मार्ट सिटीमार्फत प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. मिरवणूक मार्ग स्वच्छ करून त्यावर कुठलाही कचरा होणार नाही, याची दक्षता घेण्याची ताकीदही आयुक्तांनी अधिकार्‍यांना दिली.

हेही वाचा :

The post नाशिक : मनपा आयुक्तांकडून श्रीगणेश विसर्जन मिरवणूक मार्गाची पाहणी appeared first on पुढारी.