नाशिक : मनपा आयुक्त आजपासून झोपडपट्टीधारकांच्या दारी

नाशिक मनपा आयुक्त,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

स्वच्छता, आरोग्य, शिक्षण या प्राथमिक आणि मूलभूत संकल्पना झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांपर्यंत पोहोचाव्यात या उद्देशाने महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार गुरुवार (दि.२६)पासून शहरातील झोपडपट्ट्यांचा दौरा करणार आहेत. स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरात स्वच्छ, सुंदर झोपडपट्टी अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्याअंतर्गत हा दौरा केला जाणार आहे. या दौऱ्यात आयुक्त डॉ. पुलकुंडवार विद्यार्थ्यांशीदेखील संवाद साधणार आहेत.

शहरात सुमारे १५९ घोषित झोपडपट्ट्यांमध्ये १५ मेपर्यंत अभियान राबविले जाणार आहे. स्वच्छता अभियान राबविलेल्या पहिल्या तीन स्वच्छ झोपडपट्ट्यांना प्रोत्साहनपर पारितोषिक देऊन गौरविले जाणार आहे. स्वच्छता अभियानाबरोबरच गोदावरीसह उपनद्यांच्या प्रदूषणमुक्तीसाठीदेखील महापालिकेच्या गोदावरी संवर्धन कक्षामार्फत उपाययोजना केल्या जात आहेत. अभियानात घोषित झोपडपट्ट्यांमधील मूलभूत सेवा-सुविधांचा आढावा घेणे, स्वच्छतेविषयी जनजागृती केली जाणार आहे. ओला व सुका कचरा विलगीकरण, सांडपाणी भूमिगत गटारीद्वारे सोडणे या बाबी ध्यानात घेतल्या जाणार आहेत. अहवाल प्राप्तीनंतर स्वच्छ झोपडपट्टी पुरस्कार दिला जाणार आहे.

या दौऱ्यात आयुक्त महापालिका तसेच खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांशीदेखील संवाद साधणार आहेत. तत्कालिन आयुक्त तुकाराम मुंढे यांनीदेखील शहरातील विविध विद्यार्थ्यांसमवेत संवाद साधताना स्वच्छता राखण्याबाबतचे आवाहन केले होते. त्यांचा हा प्रयोग त्यावेळी बऱ्यापैकी यशस्वी झाला होता. असाच काहीसा प्रयोग आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांच्याकडून केला जात आहे.

आयुक्त आज प्रभाग क्रमांक २४ मध्ये

स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरात स्वच्छ, सुंदर झोपडपट्टी अभियान राबविले जात असून, त्यानुसार महापालिका आयुक्त आज प्रभाग क्रमांक २४ मधील लेखानगर येथील झोपडपट्टीचा दौरा करणार आहेत. त्यांच्यासमवेत महापालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी असणार आहेत. सायंकाळी ५ पासून दौऱ्याला सुरुवात होणार आहे.

हेही वाचा : 

The post नाशिक : मनपा आयुक्त आजपासून झोपडपट्टीधारकांच्या दारी appeared first on पुढारी.