नाशिक : मनपा कर्मचार्‍यांना सातव्या वेतन आयोगाचा फरक अदा करण्याचा आदेश जारी

सातव्या वेतनाचा फरक,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महापालिकेच्या साडेचार हजार कर्मचार्‍यांना सातव्या वेतन आयोगाचा फरक अदा करण्याबाबत अखेर मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आदेश जारी केले. त्यामुळे कर्मचार्‍यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. लेखा व वित्त विभागाने आडमुठे धोरण घेतल्यामुळे फरक जमा होण्याची चिन्हे मावळली होती. परंतु, कर्मचार्‍यांचा असंतोष पाहता आयुक्तांनी तत्काळ आदेश जारी केले

मनपा कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू झाला. परंतु, त्याचा फरक अद्याप त्यांच्या पदरात पडलेला नाही. संघटनांनी मनपा प्रशासनाला आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर तत्कालीन आयुक्त कैलास जाधव यांनी फरक देण्याचे मान्य केले होते. त्यासाठी आर्थिक तरतूदही करण्यात आली. जाधव यांच्या बदलीनंतर तत्कालीन आयुक्त रमेश पवार यांनी फरक अदा करण्याचे आदेश जारी केले. कर्मचार्‍यांना पाच टप्प्यांत फरकाची रक्कम दिली जाणार आहे. ऑगस्ट पेड इन सप्टेंबरमध्ये पहिल्या टप्प्यातील रक्कम अदा केली जाणार होती. परंतु, लेखा विभागाने कार्यवाही न केल्याने फरक जमा होण्याबाबत शंका निर्माण झाली होती. फरक अदा करण्यास टाळाटाळ केली जात होती. मात्र, याबाबत कर्मचार्‍यांनी संताप व्यक्त केल्याने आयुक्तांनी दखल घेत पहिला हप्ता सप्टेंबर महिन्यात अदा करण्याचे आदेश पारीत केले. या आदेशामुळे मनपा वाहनचालक संघटनेतर्फे आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्यासह उपआयुक्त प्रशासन मनोज घोडे-पाटील, वित्त अधिकारी नरेंद्र महाजन यांचे आभार मानण्यात आले.

हेही वाचा :

The post नाशिक : मनपा कर्मचार्‍यांना सातव्या वेतन आयोगाचा फरक अदा करण्याचा आदेश जारी appeared first on पुढारी.