नाशिक : मनपा कर्मचार्‍यांच्या सातवा वेतन आयोगाच्या फरकाचा मुहूर्त हुकला

नाशिक महानगरपालिका www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महापालिकेतील 4 हजार 673 कायम तसेच 3231 सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम मिळण्यासाठी पुन्हा प्रतीक्षा करावी लागणार आहे. यामुळे कर्मचार्‍यांचा हिरमोड झाला असून, आता 15 सप्टेंबरची प्रतीक्षा कर्मचार्‍यांना करावी लागणार आहे.

केंद्र व राज्य सरकारच्या धर्तीवर महापालिकेने कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू केला. त्यामुळे मनपावर मोठा आर्थिक भार पडणार आहे. महापालिकेतील अधिकारी, कर्मचार्‍यांना प्रत्यक्ष 1 एप्रिल 2021 पासून सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनश्रेणी व भत्ता लागू केला. त्यानंतर वेतन फरकाची प्रलंबित रक्कम पाच टप्प्यात अदा करण्याचा निर्णय झाला होता. पहिल्या टप्प्यातील रक्कम ऑगस्ट पेड इन सप्टेंबरच्या वेतनात अदा केली जाणार असल्याने मनपाचे 4673 नियमित कर्मचारी आणि 3232 सेवानिवृत्त कर्मचारी तसेच दहा हजारांहून अधिक शिक्षकांना फरक मिळण्याची आशा होती. मात्र, वेतन फरकाची रक्कम देणारे सॉफ्टवेअरच तयार झालेले नाही. सॉफ्टवेअरची 1 सप्टेंबर रोजी चाचणी घेऊन त्यानंतर, लेखा विभागातील कर्मचार्‍यांना प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी नरेंद्र महाजन यांनी सांगितले. महापालिकेत जवळपास एक हजारांहून अधिक शिक्षक आहेत. त्यांना सातव्या वेतन आयोगाचा फरक ऑफलाइन दिला जाणार आहे. त्यासंदर्भात शिक्षण विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत.

96 कोटींचा पहिला हप्ता
वेतन आयोगाचा फरक पाच टप्प्यांत अदा होणार असून, पहिल्या टप्प्यात 96 कोटी रुपये अदा केले जातील. मनपातील कायम अधिकारी, कर्मचारी तसेच सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना वेतन आयोगानुसार उपदान, अंशराशीकरणापोटी देय फरकाची रक्कम अदा केली जाणार आहे. 2016-17 मध्ये सेवानिवृत्त झालेल्यांना 2022-23, 2017-18 मध्ये सेवानिवृत्त झालेल्यांना 2023-24, 2018-19 मध्ये सेवानिवृत्त झालेल्यांना 2024-25, 2019-20 मध्ये निवृत्त झालेल्यांना 2025-26 आणि 2020-21 मध्ये निवृत्त झालेल्या कर्मचार्‍यांना 2026-27 पर्यंत फरकाची रक्कम अदा केली जाणार आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : मनपा कर्मचार्‍यांच्या सातवा वेतन आयोगाच्या फरकाचा मुहूर्त हुकला appeared first on पुढारी.