नाशिक मनपा डुकरांना शहरातून हद्दपार करणार

डुकरांना करणार हद्दपार नाशिक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
डुकरांपासून स्वच्छता कमी आणि त्यांचा नागरिकांना उपद्रवच अधिक होत असल्याने मनपा हद्दीतील सर्व डुकरांना शहरातून हद्दपार करण्याचा निर्णय मनपाच्या पशुसंवर्धन विभागाने घेतला आहे. वराह पालकांनी त्यांची जनावरे शहराबाहेर घेऊन न गेल्यास डुकरांना ठार करण्याचा इशारा पशूसंवर्धन विभागाने दिला आहे.

डुकरांमार्फत गाव, शहर, वस्त्यांची स्वच्छता राखली जाते. कचराकुंडी तसेच इतरही सर्व प्रकारची घाण खाऊन स्वच्छता राखण्याचे काम डुकरांमार्फत होत असते. परंतु, सध्या नाशिक शहरापुरता विचार करायचे झाल्यास मनपाच्या घंटागाडी योजनेमुळे घराघरांतून कचरा संकलन केला जात असल्याने चौक, रस्ते, कॉलनी, वस्त्यांमधील कचराकुंड्या जवळपास हद्दपार झाल्या आहेत. यामुळे कचराकुंड्या आणि उघड्या नाली, गटारेही नसल्याने डुकरांना खाद्य मिळणेही कठीण झाले आहे. अशा स्थितीत या डुकरांकडून शहरातील स्वच्छता कमी आणि उपद्रव अधिक वाढू लागल्याने त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्याचबरोबर नागरिकांच्या आरोग्यालाही त्यामुळे धोका निर्माण होण्याची भीती असल्याने मनपाने वराह पालनास शहरात बंदी घालण्यात आली आहे, असे असतानाही शहर परिसरात काही लोक वराह पालनाचा व्यवसाय करतात. परंतु, संबंधित लोक डुकरांना मोकाट सोडत असल्याने त्याचा त्रास इतरांनाही सहन करावा लागत आहे.

त्यासंदर्भात मनपा पशुसंवर्धन विभागाकडे नागरिकांच्या तक्रारी येत असल्याने त्यानुसार शहराबाहेर डुकरांना न हलविल्यास त्यांना थेट ठार करण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे. मनपा अधिनियमातील तरतुदींच्या अनुषंगाने शहरात डुक्कर आढळून आल्यास त्याला मारण्याची कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळेच आता मोकाट कुत्र्यांप्रमाणेच डुकरे पकडण्यासाठी पथक नेमले आहे.

हेही वाचा :

The post नाशिक मनपा डुकरांना शहरातून हद्दपार करणार appeared first on पुढारी.