नाशिक मनपा : निवडणूक प्रक्रिया थांबविण्याचे आदेश

नाशिक मनपा,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे-फडणवीस सरकारने 2017 नुसारच प्रभाग रचना करण्याचा निर्णय घेतल्याने राज्य निवडणूक आयोगाने सध्या राज्यात सुरू असलेल्या महापालिका निवडणुकीची प्रक्रिया थांबविण्याचे आदेश महापालिका प्रशासनाला दिले आहेत. यामुळे 5 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात येणारी प्रभागनिहाय अंतिम आरक्षणाची अधिसूचनाही थांबविण्यात आली आहे. एकूणच आयोगाच्या निर्देशांमुळे निवडणूक प्रक्रिया आहे त्या टप्प्यावर थांबविण्यात आली आहे.

गेल्या वर्षी ऑगस्टपासून अजूनही मनपा निवडणूक प्रक्रिया सुरूच असून, निवडणुकीचा तिढा सुटत नसल्याने लोकप्रतिनिधींसह इच्छुक उमेदवारांमधील उत्सुकता संपुष्टात आली आहे. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने त्रिसदस्यीय प्रभाग रचनेचा निर्णय घेतला. त्यानुसार प्रभाग रचना, मतदारयाद्या त्यानंतर ओबीसी आरक्षणाचा घोळ मिटला. प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सरकारने तत्कालीन सरकारचा सदस्य संख्यावाढीचा निर्णयच बेकायदेशीर ठरवला. 2017 नुसारच निवडणूक घेण्याचा निर्णय घेतल्याने महाविकास आघाडीची त्रिसदस्यीय प्रभाग रचना धोक्यात आली. नाशिक मनपातील 133 ची सदस्य संख्या 2017 प्रमाणे 122 इतकी होणार आहे. यामुळे प्रभाग रचना पुन्हा बदलणार असल्याने निवडणूक आयोगाच्या भूमिकेकडे लक्ष लागले असतानाच राज्य निवडणूक आयोगाने गुरुवारी (दि. 4) सायंकाळनंतर नाशिकसह 18 महापालिकांना पत्र पाठवत त्रिसदस्यीय निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यास सांगितले आहे. या निर्देशांमुळे चारसदस्यीय रचनेचा मार्ग मोकळा झाला आहे. ओबीसीसह महिला आरक्षण सोडतीनंतर 5 ऑगस्ट रोजी प्रभागनिहाय अंतिम आरक्षणाची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार होती. मात्र, आयोगाने सर्व प्रक्रियाच थांबविण्याचे आदेश दिल्याने अधिसूचनेलाही ब—ेक लागला आहे.

निवडणुकीसंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रिया आहे त्या टप्प्यावर थांबविण्याबाबत पत्र महापालिकेला पाठविले आहे. त्यानुसार शुक्रवारी (दि. 5) प्रसिद्ध होणारी प्रभागनिहाय अंतिम आरक्षणाची अधिसूचना थांबविण्यात आली असून, निवडणूक प्रक्रिया थांबविली आहे.
– मनोज घोडे-पाटील, उपआयुक्त,
मनपा निवडणूक विभाग

हेही वाचा :

The post नाशिक मनपा : निवडणूक प्रक्रिया थांबविण्याचे आदेश appeared first on पुढारी.